– राकेश सिन्हा यांची ग्रामायण प्रदर्शनाला भेट
नागपूर :- “ग्रामायण संस्थेच्या माध्यमातून स्वदेशी परंपरेला पुनर्स्थापित करण्याचे काम होत आहे. विविध क्षेत्रातील कलाकार, उत्पादक आणि प्रतिभावान व्यक्तीना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम ग्रामायण करीत असल्याचे कौतुक माजी राज्यसभा खासदार प्रो. राकेश सिन्हा यांनी केले. संस्थेच्या कार्याचे अभिनंदन करीत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
नागपूर येथील अमृत भवन येथे आयोजित ग्रामायण प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. विविध स्टॉल्सला भेट देऊन त्यांनी तेथील उत्पादनांची पाहणी केली. ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे आणि सचिव संजय सराफ यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना राकेश सिन्हा म्हणाले, “ज्या कलाकारांची कला आणि उत्पादने आजही मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत, त्यांना संधी देण्याची गरज आहे. समाजात त्यांच्या प्रकाशाचा पोहोच होत नाही, त्यामुळे त्यांच्या कलेसह आपली परंपराही नष्ट होत जात आहे. ग्रामायण संस्थेने या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे., असे कौतुक केले.
त्यांनी पुढे सांगितले, “भारतीय परंपरा ही केवळ भूगोलापुरती मर्यादित नसून ती कला, नृत्य, चित्रकला आणि उत्पादन यांचा एक अनोखा मिलाफ आहे. मात्र, पाश्चात्य प्रभावांमुळे या परंपरेला मोठा धोका निर्माण झाला होता. ग्रामायणने या परिस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, डॉ. हेडगेवार यांच्या स्वप्नानुसार समाजातील प्रत्येक घटकाला भारतीय परंपरेशी जोडण्याचे कार्य केले आहे.”
कार्यक्रमास ग्रामायण प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि नागपूरमधील अनेक नागरिक उपस्थित होते.