कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बांधकाम नकाशाच्या मंजुरीसाठी दिरंगाई करू नका

-स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांचे नगर रचना विभागाला निर्देश

नागपूर, ता. १९ : मनपाच्या नगर रचना विभागाकडे नवीन इमारतीच्या बांधकामासाठी अनके अर्ज प्राप्त होत असतात. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही नगर रचना विभागाकडून बांधकामाच्या नकाशाला लवकर मंजुरी मिळत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अर्जात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या नागरिकांना त्रास न देता त्यांना लवकर मंजुरी द्यावी, असे निर्देश स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी नगररचना विभागाला दिले. मंगळवारी (ता. १८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात स्थापत्य समितीची नगर रचना विभागाशी संबंधित माहितीबाबत आढावा बैठक पार पडली.

यावेळी स्थापत्य समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्यासह, सदस्या रूपा राय, वंदना भुरे, वंदना चांदेकर, नगर रचना उपसंचालक प्रमोद गावंडे, नगर रचना विभागाचे मंगेश गेडाम, आनंद मोखाडे उपस्थित होते.

 नगर रचना विभागाद्वारे आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त महसूल जमा केल्याबद्दल सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी नगर रचना विभागाचे अभिनंदन केले. तसेच आणखी महसूल गोळा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. बांधकाम नकाशाला मंजुरी दिल्यानंतर नगर रचना विभागातर्फे बांधकामाच्या ठिकाणी जाऊन मंजूर नकाशानुसार बांधकाम होत आहे किंवा नाही यासंबंधीची पाहणी करावी. बांधकाम सुरु  असतानाच आवश्यक त्या सूचना दिल्यास ५३ आणि ५४ ची कारवाई करावी लागणार नाही. तसेच प्रलंबित प्रकरणांची योग्य तपासणी करून लवकर ते मार्गी लावण्यात यावे, असे ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, शहरात घराच्या किंवा इमारतीच्या बांधकामादरम्यान निघालेला मलबा रस्त्यावर टाकलेला असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा नागरिकांवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत योग्य ती कारवाई करावी आणि याबाबतचे पत्र सर्व झोन कार्यालयांना पाठविण्यात यावे, असे निर्देशही यावेळी सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.

 १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत नगर रचना विभागाकडे ७२३ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी २५९ प्रकरणे मंजूर तर  २३८ प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. २२६ प्रकरणे प्रक्रियेत आहेत. यामध्ये ४ प्रकरणे नागपूर सुधार प्रन्यासची असल्यामुळे ती प्रकरणे त्यांच्याकडे परत पाठविण्यात आली असल्याची माहिती नगर रचना उपसंचालक प्रमोद गावंडे यांनी यावेळी दिली.

आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी नगर रचना विभागाला १०२.६७ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र या आर्थिक वर्षात नगर रचना विभागाद्वारे १४२.६१ कोटी रुपये जमा केलेले आहे. यामध्ये गुंठेवारी मधून २६.५४ कोटी रुपये जमा झालेले आहेत, अशी माहिती सुद्धा प्रमोद गावंडे यांनी यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पौर्णिमा दिवसानिमित्त मनपा-ग्रीन व्हिजिलतर्फे माटे चौकात जनजागृती

Wed Jan 19 , 2022
नागपूर, ता. १९: वीज बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सहकार्याने तत्कालीन महापौर अनिल सोले यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या पौर्णिमा दिवसाने आज चळवळीचे स्वरूप घेतले आहे. पौर्णिमा दिवसानिमित्त मंगळवारी (ता. १८) मनपा कर्मचारी व ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (माटे चौक) चौकात वीज बचतीचे महत्व सांगून जनजागृती केली.             यावेळी माजी महापौर नंदा जिचकार, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, माजी आमदार अनिल सोले यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com