– ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा समारोप
नागपूर :- कुठलाही कचरा टाकाऊ नसतो, असे माझे मत आहे. कचऱ्याचा वापर, त्याचे रिसायकलिंग करून आपण अनेक कामांमध्ये वापरू शकतो. दिल्लीतील २० लाख टन कचरा आम्ही रस्त्यांच्या निर्मितीसाठी वापरला. कचऱ्यामधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वेगळे काढता येते. त्याचा वापर रस्तेबांधणीत करता येतो. त्यामुळे टाकाऊ वस्तूंमधून अर्थाजन आणि त्यातून महिलांचे सक्षमीकरण ही महानगरपालिकेची संकल्पना आदर्श ठरेल. कारण कचऱ्याचा योग्य वापर केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) व्यक्त केले.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त बुधवारी २ ऑक्टोबर रोजी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध वारसास्थळांची सफाई अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत कस्तुरचंद पार्क येथील स्वच्छता अभियान कार्यक्रमात आयोजित श्रमदान कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डीआयजी प्रशांत जांभुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘कचऱ्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी आता कचऱ्यातून इंधन निर्मितीच्या दिशेने काम सुरू आहे. प्लास्टिकपासून टाईल्सची निर्मिती करून नागपूर महानगरपालिकेने त्याचा वापर सुरू करावा,’ अशी सूचनाही ना. गडकरी यांनी केली. स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अस्वच्छतेमुळे प्रदूषण वाढते आणि प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्यमान कमी होते. त्यामुळे जीवनात सदैव स्वच्छतेचे अनुकरण करण्याची प्रतिज्ञा घेऊया, असे आवाहनही त्यांनी केले. ना.गडकरी यांच्या हस्ते मनपाच्या नवनिर्मित तीन स्मार्ट पब्लिक टॉयलेट आणि आरआरआर सेंटरचे लोकार्पण झाले. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन मनीष सोनी यांनी केले.