मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कस्तुरबा रुग्णालयात जाऊन केली रुग्ण- नातेवाईकांची विचारपूस, आरोग्य यंत्रणेकडून घेतला आढावा

मुंबई :- मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग यांनी व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिकेने सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

मुंबई शहरातील गोवर प्रादुर्भावामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याठिकाणी त्यांनी महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली.

या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपचारांबाबत आणि अनुषंगिक बाबींची माहिती घेतली. नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण न झाल्यामुळे बालकांमध्ये प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. याबाबत महापालिकेची आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेने तातडीची उपाययोजना म्हणून एका मोहिमेत सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केले आहे. लसीकरणापासून दूर राहिलेल्या बालकांना लस देण्याबाबत संबंधित सर्वच क्षेत्रात जाणीवजागृती करण्यात येत आहे. तेथील लोकप्रतिनिधींपासून महत्वाच्या आणि प्रमुख अशा व्यक्तींशी संपर्क साधण्यात येत आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे बालकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या आणि आवश्यक अशा सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. बालकांना चांगले उपचार मिळावेत, यासाठीही निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व परिस्थितीवर आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी सतर्कपणे आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही दिल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर राज्य शासनाचा निर्णय

Fri Nov 18 , 2022
मुंबई :- राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपट्टीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता, त्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागासाठी १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे लाखो बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com