राज्यात 10 लाख विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसह वाचनाची सवय वाढीस लागण्यासाठी प्रयत्न – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई :- वनसाईट इझीलर लक्झोटिका फाऊंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांची नेत्र आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढीस लागावी यासाठी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळांमध्ये दोन हजार ग्रंथालये स्थापन करून त्यात दोन लाख पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.           शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत रामटेक या शासकीय निवासस्थानी आज याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी वनसाईट फाऊंडेशनच्या संचालक श्रीमती स्वाती पिरामल, फाऊंडेशनचे प्रमुख अनुराग हंस, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे राजीव मेहता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव इम्तियाझ काझी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वनसाईट फाऊंडेशनमार्फत आतापर्यंत सहा लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी झाली आहे. यापैकी 16 हजार विद्यार्थ्यांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा पुढील टप्पा म्हणून येत्या तीन वर्षात आणखी दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने वनसाईट फाऊंडेशन, रत्ननिधी ट्रस्ट आणि शालेय शिक्षण विभागादरम्यान त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. यातील एक लाख विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रत्ननिधी ट्रस्टच्या माध्यमातून तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता प्रदान करून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि रत्ननिधी ट्रस्टमध्ये द्विपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला असून या माध्यमातून संस्थेमार्फत दर्जेदार कथा पुस्तके, चित्र पुस्तके, बालवाडी पुस्तके, कनिष्ठ, मध्यम आणि वरिष्ठ शाळांसाठी शैक्षणिक संदर्भ पुस्तके तसेच कनिष्ठ महाविद्यालयांसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक आणि संदर्भ पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

दहा लाख विद्यार्थ्यांचे नेत्र आरोग्य राखण्याबरोबरच दर्जेदार पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड वाढविण्यासाठी या दोन्ही करारांचा लाभ होईल, असा विश्वास मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबूबनगर-ढोण रेल्वेमार्गाचा मार्ग मोकळा

Fri Aug 18 , 2023
– एकूण 2339 किमी लांबीच्या, सुमारे 32,500 कोटी रुपये किंमतीच्या – सात बहु-मार्ग (मल्टीट्रॅकिंग) प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी नवी दिल्ली :- भारतीय रेल्वेच्या सेवांचा विकास आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 7 प्रकल्पांना मंजुरी दिली असून, यात राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबूबनगर-ढोण या मार्गाचा समावेश आहे. एकूण 32,500 कोटी रुपयांच्या सात रेल्वे प्रकल्पांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक समितीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!