सुशिक्षित बेरोजगारांची साडेतेरा लाखांनी फसवणूक

-परीक्षा, वैद्यकीय तपासणीही मात्र नोकरीचा पत्ता नाही

नागपूर :- केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आयुध निर्माणी कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन सुशिक्षित बेरोजगारांची 13 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक केली. विश्वास प्राप्त करण्यासाठी आधी परीक्षा, नंतर वैद्यकीय तपासणीही करून घेतली. परंतु नोकरी मिळाली नाही. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

राजीव रेड्डी रा. मानकापूर, मिर्झा वसीम बेग रा. यवतमाळ, सूरज घोरपडे, सोनाली घोरपडे रा. देवळी, वर्धा, शैलेश गोल्हे रा. मानेवाडा, ज्ञानेश्वर सिर्सीकर, रोशन अड्याळकर आणि नीतेश कोठारी अशी आरोपींची नावे आहेत.

राजीव रेड्डी फसवणूक प्रकरणातील म्होरक्या आहे. त्याने स्वत:ची टोळी बनविली. एक जण ग्राहक आणतो. दुसरा नोकरीचे प्रमाणपत्र दाखवून हमी देतो. तिसरा परीक्षा घेतो. चौथा वैद्यकीय तपासणी करून घेतो अशा पद्धतीने टोळीतील सदस्य काम करतात. या माध्यमातून आरोपींनी अनेक सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे.

समताबाग, हिंगणघाट येथील रहिवासी फिर्यादी मंगेश चावरे हा सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याचा मित्र शैलेश गोल्हे हा आधी हिंगणघाटला राहायचा. कामाच्या शोधात तो नागपुरात आला. त्याची बहीण सोनाली विवाहित असून, ती नागपुरात राहायची. शैलेशने फिर्यादीला सांगितले की, त्याचा जावई सूरज घोरपडे याला अलीकडेच आयुध निर्माणी कंपनीत नोकरी लागली. राजीव नावाचा व्यक्ती नोकरी लावून देतो. एवढेच काय तर शैलेशने त्याच्या जावयाचे नियुक्तिपत्र आणि ओळखपत्रदेखील दाखविले. त्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला.

फिर्यादी जाळ्यात अडकल्याचे पाहून त्याला नागपुरात बोलाण्यात आले. धरमपेठ येथील सौंदर्य इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस या कार्यालयात नेण्यात आले. तेथे आरोपी राजीवसोबत त्याची भेट करून देण्यात आली. राजीवने फिर्यादीला नोकरी लावून देण्याची हमी दिली. फिर्यादी तयार होताच 9 लाख रुपयांत सौदा पक्का झाला. आधी साडेचार, तर नोकरी लागल्यानंतर साडेचार लाख रुपये असे एकूण 9 लाख रुपये दोन टप्प्यांत द्यायचे होते. फिर्यादीने स्वत:चा भूखंड विकून साडेचार लाख रुपये दिले. त्याच्यासोबतच गावातील इतर चार लोकांनाही जाळ्यात ओढण्यात आले. त्यांनीही नोकरीसाठी रोख रक्कम दिली. नोकरी मिळाली नाही तसेच पैसेही मिळत नसल्याने फिर्यादीने सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून वपोनि आसाराम चोरमले यांना सारा प्रकार सांगितला. तक्रारीवरून पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.

असा झाला भंडाफोड

पीडितांची धरमपेठ येथे परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. बराच कालावधी लोटल्यानंतरही नोकरीचा थांगपत्ता नव्हता. दरम्यान फिर्यादीने गोपनीय माहिती मिळविली असता शैलेशचा जावई सूरज हा घरीच राहत असून, त्याला कुठलाच कामधंदा नसल्याचे समजले, तसेच सोनाली, शैलेश आणि सूरजच्या बँक खात्यांत लाखो रुपये असल्याचे समजल्यानंतर फिर्यादीला शंका आली. नंतर सर्वांनीच पैसे परत मागितले. शैलेशने त्याच्या दोन नातेवाईकांचे पैसे परत केले. मात्र, फिर्यादी आणि अन्य दोघांची रक्कम परत केली नाही.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शंखनांद विधानसभा -2024 - लक्ष्य रामटेक विधानसभा 2024 पदाधिकारी मंथन बैठक थाटात

Wed Jun 12 , 2024
रामटेक :- रविवारी झालेल्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा च्यावतीने रामटेक येथील गंगा भवन येथे रामटेक विधानसभा -2024 च्या अनुषंगाने पदाधिकारी मंथन बैठक रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांच्या नेतृत्वात मोठ्या थाटात पार पडली. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडून रामटेक लोकसभेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भरगोस मतांनी विजय प्राप्त केला. आता लक्ष्य रामटेक विधानसभा 2024 असून शिवसेना पक्षाने रणशिंग फुकले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com