संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
स्वातंत्र संग्राम सैनिक प्रा. रतन पहाडी : राहिल्या फक्त आठवणी
कामठी :- 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या विरूध्द “भारत छोडो”चा नारा दिला होता. त्यांनी चालविलेल्या या आंदोलनात इंग्रजांची दमछाक करणा-या स्वातंत्र संग्राम सैनिकांमध्ये कामठी शहर व कामठी तालुक्यातील एकुण 26 लोकांचा समावेश होता. यात प्रामुख्याने प्रा. रतन पहाडी यांच्या नावाचा समावेश होता. या लढयात इंग्रजांच्या शासनकाळात कारागृहात कारावास भोगणा-यांमध्ये सुध्दा प्रा. रतन पहाडी याचा समावेश होता. सन 1942 च्या स्वातंत्र संग्राम “भारत छोडो” चळवळीत वाराणसी (उ.प्र.) जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणा-यात सर्वात कमी वयाच्या जवळपास 16 वर्षाचे स्वातंत्र संग्राम सैनिक म्हणून. डॉ. रतनचंद जैन(पहाडी) या सर्वात लहान वयाच्या स्वातंत्र संग्राम सैनिकात त्यावेळेस त्यांच्या विद्यार्थी अवस्थेत देशभक्तीची स्वयंस्फुर्त भावना निर्माण झालेली होती. त्यावेळेस इंग्रज शासनाच्या विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने “रणभेरी” पत्रिकेचे प्रकाशन केल्या जात होते. या पत्रिकेचे क्रांतीकारी साहित्य इंग्रज अधिका-यां करीता आव्हान बनले होते. डॉ. पहाडी जेव्हा वाराणसीच्या बाजारात या पत्रिकेचे वाटप करीत होते, तेव्हा सिविल ड्रेस मध्ये फिरणा-या इंस्पेक्टर भवानी यांच्या ते हाती लागले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालला. त्यावेळेस क्रांतीकारी सचिन्द्रनाथ सान्याल व त्यांचे इतर सह-क्रांतीका-यांसोबतच शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रो. गेरोला, जयचंद विद्यालंकार, अय्यर यांची टीम मदत करीत होती. त्यावेळेस क्रांतीका-यां करीता ग्वालियर मधून पिस्टोले वाराणसीला पोहोचविण्यात येत होती. अश्याच 6 पिस्टोल प्रकरणी त्यांचे युवा क्रांती समूहाचे कर्णधार बालचंद जैनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. रतन पहाडी यांनी 5 पिस्टोल येथील गंगा नदित प्रवाहित केली होती व एक पिस्टोल वाराणसी येथील छेदीलाल मंदिरात प्रतिमेच्या मागे लपवून ठेेवण्यात आली होती. परंतु तत्कालीन पोलीस इंस्पेक्टर राम सिंह यांनी त्यांना अटक केली. त्यांना 27 ऑक्टोबर 1942 मध्ये कलम 38(5) अन्वये अटक करण्यात आली होती. त्यांना 6 महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळेस त्यांचे वय केवळ 16 वर्ष होते. त्यावेळेस वाराणसी येथील कारागृहात डॉ. संपूर्णानंद, स्वामी स्वरूपानंद यांना सुध्दा ठेवण्यात आले होते. त्यांच्या सोबत बंद असलेल्यांना कंबल न मिळाल्याने देशप्रेमाच्या भावनेने भरलेल्या या युवकांनी “इंकलाब जिंदाबाद”चे नारे लावत कारागृहातच रात्रीला लागलेल्या दिव्यांना फोडून त्यातील रॉकेलने कारागृहाला जाळण्याचा प्रयत्न सुध्दा केल्या गेला. परंतु या क्रांतीका-यांचे नारे ऐकूण कलेक्टर फिनले, पोलीस कॅप्टन हक्सवर्ध तेथे पोहचले. त्यांना क्रांतीकारी पत्रिकेचे वाटप करणे, इंग्रज शासनाच्या विरूध्द विद्रोह भडकविणे या आरोपाखाली 6 वेळा पोलीसांनी अटक केली. त्यांच्या कडून क्रांतीका-यांच्या संबंधात सखोल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना शारिरीक यातना सुध्दा दिल्यात. अंगठयाच्या नखाखाली सुई टोचणे, पायात बेडया घालणे, उपाशी ठेवणे इत्यादी प्रकार यांच्या सोबत होत होते. कारावासाच्या दरम्यान माजी खासदार राजाराम शास्त्री, सिताराम मैत्रेय, आंध्राचे अय्यर हे सुध्दा त्यांच्या सोबत होते. आपल्या विद्यार्थी जिवनात वाराणसीच्या बंगाली टोला क्षेत्रात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सानिध्य प्रा.रतन पहाडी यांना लाभले. त्यांच्या सोबत कारावासात राहणा-या काही क्रांतीका-यांना आजीवन कारावास किंवा फासीची शिक्षा सुध्दा सुनावण्यात आली होती. देश स्वातंत्र झाल्यानंतर डॉ. रतन पहाडी यांनी शिक्षण क्षेत्राशी जवळीक साधली. राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा, राज महाविद्यालय अमरावती, पोरवाल महाविद्यालय कामठी येथून अध्यापक कार्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते प्राकृतिक चिकित्सा क्षेत्राशी जुडले. 16 वर्षाचा बालक म्हणून स्वातंत्र्याच्या लढयात भाग घेऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाचा अगदी जवळून अनुभव घेतला.
“भारत छोडो” आंदोलनात कामठी तालुक्यातील एकुण 26 लोकांचा होता समावेश
9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी यांनी इंग्रजांच्या विरूध्द “भारत छोडो”चा नारा दिला होता. त्यांनी चालविलेल्या या आंदोलनात इंग्रजांची दमछाक करणा-या स्वातंत्र संग्राम सैनिकांमध्ये कामठी शहर व कामठी तालुक्यातील एकुण 26 लोकांचा समावेश होता. यामध्ये एक मुस्लिम समुदायातील मोहम्मद रफी शेख इदू नावाच्या व्यक्तीचा समावेश होता. यासोबतच या लढयात येथील दोन महिला मंजुळाबाई बुधाजी गोसावी व जनाबाई रामचंद्र भगत यांचा सुध्दा सक्रिय सहभाग होता. स्वातंत्र्याच्या या लढयात आपली प्राणाहुती देऊन हौतात्म पत्करणा-यांमध्ये हुतात्मा उमाशंकर दयाराम खराबे रा. वडोदा व हुतात्मा उमाशंकर रेवाशंकर पंडया रा. कामठी या दोघांचा समावेश होता.
वडोदा येथील हुतात्मा उमाशंकर दयाराम खराबे यांनी स्वातंत्र्याच्या लढयात दि.10 ऑगस्ट 1942 रोजी आपली प्राणाहुती दिली. त्याच प्रमाणे कामठी येथील हुतात्मा उमाशंकर रेवाशंकर पंडया यांनी 8 ऑगस्ट 1942 रोजी आपल्या प्राणाची आहुती दिली.
या लढयात इंग्रजांच्या शासनकाळात कारागृहात कारावास भोगणा-यांमध्ये भैय्याजी खराबे, मगनलाल बांगडी, शामराव हरबाजी अतकरी, बुध्दगीर हिरागीर गोसावी, अमृत आत्माराम खराबे, गुलाब मंगलशा, लक्ष्मण सिताराम वाळके, जनाबाई रामचंद्र भगत, मंजुळाबाई बुधाजी गोसावी, भुया दयाराम खराबे, नामदेव तुकाराम शेलाकार, रामाजी वाळके, भिकाजी जागो फटिंग, रामचंद्रगीर किसन गोसावी सर्व राहणार वडोदा, कवडू सुकाजी आष्टनकर, मोहम्मद रफी शेख इदु, प्रभाकर राजाराम खाखडे, सावशील मणिलाल खरडकर, मुन्नालाल भुरमल तिवारी, सदाशिव व्यंकटेश वैद्य, श्रीराम रामजीवन शर्मा, विठ्ठलराव संगेवार, प्रभाकर हांडा, कुंजीलाल शिंदे, भारतलाल शिंदे, डॉ. रतनचंद पहाडी सर्व रा. कामठी यांचा समावेश होता.