– संत्रा फळ पीक विमा योजनेला मुदत वाढ देण्याची मागणी !
– संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन !
मोर्शी :- फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्याची अंतिम तारीख २५ जुन असून ऑनलाईन सिस्टीम गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी असंख्य अडचणी येत आहेत. याबाबद शासन तसेच प्रशासकीय यंत्रणेने गंभीर दखल घेऊन या योजनेचा हप्ता भरण्याचा कालावधी वाढविण्यात यावा अशी आग्रही मागणी मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
फळ पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे ऑनलाईन करून पैसे भरण्याची पावती निघत नसल्यामुळे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने शेतकऱ्यांना संत्रा फळ पीक विमा योजनेचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्याची इच्छा असूनदेखील विमा हप्ता भरता येत नाही. अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी वर्ग सापडला आहे.
त्यात विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख २५ जुन असून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने विमा हप्ता भरणे दुरापास्त झाले आहे.शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.या गोष्टीची तातडीने गंभीर दखल घेऊन लोक प्रतिनिधी, शासन व प्रशासकीय यंत्रणेने शासनस्तरावरती तातडीने पाठपुरावा करून विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत वाढ वाढवून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे.
नैसर्गीक संकटांमुळे मोर्शी वरूड तालुक्यातील फळबागा उध्वस्त होत असल्यामुळे विमा उतरविण्यासाठी शेतकरी इच्छुक होते. मात्र, विमा काढण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व्हर बंद होता. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाहीत. या योजनेमुळे कमी किंवा जास्त पाऊस, पावसाचा खंड व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून विशिष्ट कालावधीसाठी विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळते. यंदा कडक उन्हामुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. जून महिना संपत आला तरीही मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे सांत्राचा मृग बहार धोक्यात आल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून संत्रा बागा जिवंत राहून देखील उत्पादन मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाले असल्यामुळे विम्याच्या माध्यमातून थोडेफार नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. गेल्या हंगामात देखील फळपीक विमा योजनेला मुदतवाढ मिळाली होती. यंदा मुदतवाढ देण्याबाबत राज्याचे कृषी सचिव व आयुक्तांना कळविण्यात आले असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी फळ पीक विमा मुदतवाढीच्या प्रतीक्षेत आहे.