संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– भदन्त ससाई पोलिस आयुक्तांना भेटले
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला संविधान चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी चे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना दिले. पोलिस आयुक्त कार्यालयात भेट घेवून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूर शहरात 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी बौद्ध बांधवांसह विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय संघटनांची उपस्थिती असते. जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 13 एप्रिलला सायंकाळी शहरातील विविध भागांतून निघणार्या मिरवणुका, रॅली वाजतगाजत मध्यरात्रीच्या सुमारास संविधान चौकात पोहोचतात. या रॅलींमध्ये हजारोंचा जनसमुदाय असतो. बाराच्या ठोक्याला केक कापून आनंद साजरा केला जातो. अनुयायांची पहाटेपर्यंत गर्दी असते.
मात्र गेल्या काही वर्षांत संविधान चौकात पोलिसांचा पाहिजे तसा बंदोबस्त दिसत नाही. अपुर्या सुरक्षेअभावी क्षुल्लक कारणावरून भांडण होण्याची आणि दुचाकी चोरीला जाण्याची शक्यता असते. वाहतूक विस्कळीत होते. अव्यवस्था निर्माण होते. एवढेच नव्हे तर हजारो आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीत चेंगराचेंगरी होण्याची भीती असते. हा संभाव्य धोका आणि इतर घटना टाळण्यासाठी 13 एप्रिलच्या रात्री संविधान चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन ससाई यांनी दिले. याप्रसंगी भंते प्रज्ञा बोधी उपस्थित होते.