नागपूर :- 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधानाचा जन्मदिवस तसाच तो स्मृतीशेष डॉ. कृष्णा कांबळे यांचा सुद्धा जन्मदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी स्मृतीशेष डॉ. कृष्णा कांबळे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. मागील वर्षी या व्याख्यान मालेचे पहिले पुष्प पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी गुंफले होते.
यावर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता हिंदी साहित्य मोर भवन, झांसी राणी चौक, नागपूर येथे या व्याख्यान मालेचे हे दुसरे पुष्प आयोजित असून हे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही निमंत्रित आहेत. ते सामाजिक न्याय आणि डॉ. कृष्णा कांबळे या विषयावर व्याख्यान करणार आहेत. तर दुसरे अतिथी इंजि. अमिताभ पावडे हे डॉ. कृष्णा कांबळे यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पूज्य भदंत विमलकित्ती गुणसिरी भूषविणार आहेत.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत भरीव योगदान देणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता दामोदर मोरे यांचा गौरव करण्यात येणार आहे. समाजाच्या विकासासाठी उद्युक्त सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन स्मृतीशेष डॉ. कृष्णा कांबळे व्याख्यान मालेच्या आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.