संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे डॉ. कलाम यांचा जन्मदिन ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरा
कामठी :- पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून साजरा होत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा आमच्या कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असून . वृत्तपत्र विक्रेत्याला समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षा आहे.वृत्तपत्र विक्रेता हा घटक दुर्लक्षित आहे. त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. काहीजण वृत्तपत्र विक्रेत्यांचा ‘एकेरी’उल्लेख करतात. तर काहीजण आदरही करतात. प्रामाणिकपणाने काम करणारा हा वर्ग आहे. या घटकाकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी.
वृत्तपत्र विक्रेता ते देशाचे राष्ट्रपती हा डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे असे मौलिक मत कामठी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघाचे पदाधिकारी प्रफुल लूटे यांनी जयस्तंभ चौकात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिन कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दिपंकर गणविर, निकिलेश डोंगरे, निलेश ढोके, हुसैन अली, ताराचंद शाहु, वसीम अख्तर, धिरज वंजारी, राजेश काटरपवार, प्रदिप गायगवळी, लक्ष्मीनारायण ठाकुर, जय गजभिए, अमित अमृतकर, विलास बागरे, किशोर खेडेकर, विशाल मते, राजु मेश्राम, फैयाज़ भाई,कृष्णा पटेल इत्यादी उपस्थित होते.