अमरावती :- खासदार अनिल बोंडे भाजपला लागलेली बोंडअळी असून राहुल गांधींना शिव्या-शाप देणाऱ्या अनिल बोंडे यांना वेड लागले आहे आणि म्हणूनच सध्या ते नको तिथे, नको ते बरळत असल्यामुळे त्यांना विनाविलंब उपचारासाठी मनोरुग्णालयात हलविण्याची मागणी प्रदेश काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी केली आहे.
डॉक्टर बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल काढलेल्या अनुदगाराचा निषेध करून सात दिवसाच्या आत डॉक्टर बोंडे यांनी माफी मागून आपण खऱ्या अर्थाने सावरकरांचे अनुयायी असल्याचे सिद्ध करावे अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा ॲड.दिलीप एडतकर यांनी दिला आहे.
केवळ प्रसिद्धीसाठी शाब्दिक कोट्या करून विदूषकाची भूमिका तेवढी अनिल बोंडे बजावत आहेत. त्यांच्या सुदैवाने मिळालेली खासदारकी सर्वसामान्यांचे दुर्दैव ठरत आहे. आपली खासदारकी विकासासाठी कारणी लावण्याऐवजी डॉक्टर अनिल बोंडे केवळ तोंडाची वाफ दवडत आहेत राज्यसभेवर निवडून गेलेले अनिल बोंडे यांचा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्र असला तरी त्यांच्या मोर्शी मतदारसंघातसुद्धा त्यांच्या खासदारकीची किरणं अद्याप पोहोचलेली नाहीत. विकासाची दैना उडाली असून केवळ मिरविण्यासाठी मिळालेले राज्यसभा सदस्यत्व कुचकामी ठरत असल्यामुळे ही बिनकामाची खासदारकी डॉक्टर अनिल बोंडले सोडले तर कोणाच्याच कामाची नाही असे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
डॉक्टर अनिल बोंडे यांच्या अंगात सध्या सावरकरांचा आत्मा घुसला असून ज्यांच्या घरातील दोन-दोन पंतप्रधान शहीद झाले अशा गांधी घराण्यातील राहुल गांधी यांच्याविरुद्ध गलिच्छ भाषा वापरणाऱ्या बोंडेंवर कोणतेही संस्कार झाल्याचे दिसत नाही, तथाकथित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाने अत्यंत व्यथित झालेले डॉ.बोंडे जेव्हा शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान होत असताना तोंडात नेमके काय गिळून बसले होते ? असा सवाल दिलीप एडतकर यांनी विचारला आहे. अगदी काल-परवा धिरेंद्र शास्त्री या बकबक बगळ्याने करोडो लोकांच्या श्रद्धेचा अविभक्त भाग असलेल्या साईबाबांबद्दल गरळ ओकली,तेव्हा त्यावरही बोंडे यांनी सोयीस्कर मौन धारण केले आहे, याची आठवण देत दिलीप एडतकर यांनी डॉक्टर अनिल बोंडे यांनी सात दिवसात राहुल गांधींची जाहीर माफी मागून आपण खरे सावरकरभक्त आहोत हे सिद्ध करावे अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा ॲड. दिलीप एडतकर यांनी दिला आहे.