शनिवार 12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये भररस्त्यात राजकारणी, माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येला आता आठवडा झाला असून याप्रकरणी पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरत आहेत. मोठ्या राजकारण्याची हत्या झाल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात असून पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास केला जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्याकांडाची जबाबदारी घेत असल्याची पोस्ट रविवारी सोशल मीडियावर टाकली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या गँगच्या मुसक्या आवळत अनेकांना अटक केली.
आत्यापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली होती. तर शुक्रवारी पोलिसांनी आणखी 5 जणांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पनवेल, कर्जत तसेच डोंबिवलीमधूनही एकाला अटक झाली. सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्येचं कनेक्शन डोंबिवलीपर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी आधी डोंबिवलीतील एका गँगला मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सिद्दीकींवर गोळीबार करण्यासाठी मागितले लाखो रुपये
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरलं. महाराष्ट्राच्या राजधानीत अशाप्रकारे एका माजी मंत्र्याची गोळ्या झाडून हत्या होते हे धक्कादायक असून त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरूवात केली. त्याच तपासादरम्यान काल पोलिसांनी आणखी 5 जणांना अटक केली. पोलिसांनी पनवेल आणि कर्जत येथून आरोपींना अटक केली तसेच यापैकी एका आरोपीला डोंबिवली येथून अटक केली. तपासादरम्यान त्यांच्याकडून मिळालेल्या माहिती एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसानी काल अटक केलेल्या 5 जणांची एक स्वतंत्र गँग असून त्याचा म्होरक्या नितीन सप्रे आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटर्सनी सिद्दीकी यांची हत्या केली. मात्र तत्पूर्वी डोंबिवलीतील नितीन सप्रे गँगला सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी मिळाली होती. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करायचा आहे समजल्यानंतर सप्रे याच्याकडून तब्बल 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. शुभम लोणकर यानेच नितीन सप्रे याच्याशी संपर्क साधला होता. लोणकरच्या माध्यमातूनच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सुपारी देण्याच आल्याच समोर आलं आहे. मात्र सप्रे याने 50 लाख मागितल्यानंतर विचार बदलला आणि त्यानंतर बिश्नोई गँगच्या तीन शूटर्सनाच या हत्येसाठी पाठवण्यात आलं. धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार या तिघांनीच सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवली आणि शनिवारी संधी मिळताच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. हे पाचही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या चौकशीतून आणखी बरेच महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.