नागपूर, ता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मनपाकडे १३२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात मनपाकडे प्राप्त १३२ पैकी १०९ हरकती व सूचनांवर सुनावणी करण्यात आली. सदर सुनावणी राज्य निवडणूक आयोगातर्फे नियुक्त प्रधान सचिव (वने) श्री. बी. वेणुगोपाळ रेड्डी यांनी घेतली.
सुनावणी दरम्यान विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगरे-वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सोमवारी दुपारी १२ वाजता छत्रपती सभागृहात सुनावणीला सुरुवात झाली असून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत करण्यात आली. स्क्रिनवर प्रारूप प्रभाग रचना दाखवून, प्रभागांच्या सीमा व अन्य माहिती दाखवून सुनावणी घेण्यात आली. विविध पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वार्डातील नागरिकांनी हरकती व सूचना दाखल केलेल्या आहेत.
प्रभाग रचनेबाबत मनपाकडे १३२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या असून यात प्रभाग हद्दीबाबत ९९, आरक्षणाबाबत १९, प्रभागामध्ये समाविष्ट असलेल्या वस्त्यांच्या नावाबाबत ०९ व अन्य ०५ सूचनांचा समावेश आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण १५६ सदस्यांकरीता ५२ प्रभागाचे प्रारूप नकाशे जाहीर करण्यात आले. जाहीर सर्व ५२ प्रभाग ३ सदस्यांचे आहेत.