Ø सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा
Ø इतर विभागांनी उपक्रमात सहभाग नोंदवावा
नागपूर :- दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच शिबीराद्वारे वैश्विक ओळखपत्र (युआयडी कार्ड) व दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे दिले जाते. जिल्ह्यात ग्रामीण भागात युआयडी कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र असे मिळून आतापर्यंत 20 हजार व्यक्तींना प्रमाणपत्र तर शहरी भागात दोन हजार प्रमाणपत्र घरपोच वाटप करण्यात आले. जिल्ह्यात सुशासनातील नाविण्यपूर्ण उपक्रम इतर विभागांनी राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी केले.
सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत सभागृहात सुशासनातील नाविण्यपूर्ण उपक्रम व संकल्पनाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, शिवराज पडोळे, डॉ. रेवती साबळे, तहसीलदार निलेश काळे, चैताली सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.
206 दिव्यांगांच्या मातांना राजमाता जिजाऊ अर्थसहाय्य योजनेंतर्गत 1 हजार रुपये प्रमाणे अर्थ सहाय्य करण्यात आले असून नागपूर जिल्हा परिषदेची हीच योजना राज्य शासनाने अंगिकारुन सर्व राज्यात सुरु केली आहे. दिव्यांगासाठी घरकुल योजनेंतर्गत बांधकामासाठी 52 दिव्यांग व्यक्तींना 1 लाख 50 हजार रुपये अनूदान देण्यात आले, असे फुटाणे यांनी सांगितले.
यावेळी सुशासनातील तीन विभागातील नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये आरोग्य विभागाच्या डॉ. रेवती साबळे यांनी 0 ते 5 वर्षातील नवजात बालकांचा जन्म होताच रुग्णालयात आधारकार्ड काढण्याच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी उपक्रमांतर्गत कोरोना काळात नागरिकांना विविध दाखले व प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेतू केंद्राद्वारे सेवा देण्यात आली असल्याचे सांगितले. त्यासोबतच नागरिकांना घराजवळच विविध दाखले, प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपले सेवा केंद्र सुरु करण्यात आले. शहरात व गावात शिबीराचे आयोजन करुन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ज्या आपले सेवा केंद्राच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या त्यांची तपासणी करुन 6 केंद्रावर कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
याकार्यक्रमाचे संचालन व आभार तहसीलदार चैताली सावंत यांनी केले. विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेस उपस्थित होते.