संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आधारकार्ड अपडेटसाठी जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला ग्राह्य धरला जात आहे त्यामुळे सध्या आधारकार्ड अपडेटसाठी कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील बहुतांश वयोवृद्धांच्या अडचणी वाढल्या आहेत.बहुतांश वृद्धाकडे जन्माचा दाखला नसल्याने डोकेदुखी वाढली आहे त्यामुळे बहुतांश ज्येष्ठ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत तेव्हा आधार कार्ड अपडेटसाठी जन्म दाखल्याची अट रद्द करावी अशी मागणी कढोली ग्रामपंचायत च्या माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी केली आहे.
बहुतांश वृद्धाकडे जन्माचा दाखला नसून जन्माची नोंदच नसल्याने दाखले आणावे कोठून असा प्रश्न पडला आहे.मात्र आता सर्वच स्तरावर आधार अपडेट शिवाय शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडथळे निर्माण होत असून कामठी तहसील कार्यलयातून बऱ्याच लाभार्थ्यांचे खाते बंद झाल्याने लाभापासून वंचित झाले आहेत.आधार कार्ड अपडेट करताना कुठे अंगठा येत नाही तर कुठे जन्माच्या पुराव्या अभावी आधार अपडेट होत नाही म्हणून आधार कार्ड अपडेट साठी वृद्धांनी वयाचा दाखला आणावा कुठुन असा प्रश्न पडला आहे.मतदान कार्ड पाठोपाठ आता आधारकार्ड हा भारतीय नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा मानला जातो तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर अनेक ठिकाणी आधारकार्ड ची मागणी करण्यात येते याशिवाय शासकीय योजनेत कोणतेच काम होत नाही .सध्या ग्रामीण भागातील वृद्धाना आधार कार्ड मधील दोष दूर करण्यासाठी बऱ्याच त्रुटींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे कार्ड धारकांना कार्ड मध्ये फेरबदल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.