यवतमाळ :- ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी राज्य शासनाच्यावतीने धर्मवीर आंनद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्यावतीने आँटो चालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहे.
ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनेंतर्गत जिवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असतांना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृध्दी योजना, ६५ वर्षावरील ऑटो-रिक्षा, मिटर्ड टॅक्सी परवानाधारकांना निवृत्ती सन्मान योजनेतंर्गत सानुग्रह अनुदान, नवीन ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी खरेदी गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज यासह विविध योजना, उपक्रम राबविणे हा मंडळाचा उद्देश आहे.
मंडळाच्या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी ऑटो-रिक्षा परवानाधारक असावा, चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. परिवहन कार्यालयामार्फत या बाबतची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येईल. चालकांना मंडळाकडून ओळखपत्र जारी करण्यात येईल. मंडळाचा सभासद होण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सीचे अनुज्ञप्ती व बॅज धारण केलेले असणे बंधनकारक आहे.
पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील, तथापी कुटूंबातील सदस्य संख्या चार पर्यंत मर्यादीत राहील. जो सभासद सलग एक वर्षापेक्षा जास्त काळ मंडळाची वर्गणी अथवा मंडळांने विहीत केलेली इतर रक्कम मंडळाकडे अदा करणार नाही, अशा सभासदाचे सभासदत्व एक संधी देऊन रद्द करण्यात येईल. परवानाधारक जर अपंग झाला तर तो परवानाधारक देखील कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.
परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याची अनुज्ञप्ती त्याच्या कायदेशीर वारसास हस्तांतरीत करण्यात येते. मयत परवानाधारकाचा कायदेशीर वारस त्याचेकडे अनुज्ञप्ती, बॅज नसेल तर सदर कायदेशीर वारस लाभ घेण्यासाठी पात्र राहील. नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम ५०० रुपये राहील. वार्षिक सभासद शुल्क रक्कम ३०० रुपये असेल तसेच मंडळाने वेळोवेळी निश्चीत केल्याप्रमाणे राहणार आहे. जिल्ह्यातील ऑटो-रिक्षा व मिटर्ड टॅक्सी परावानाधारकांनी जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणी करून कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.