– शहराला कोरोनातून उभारण्यास आयुक्तांचे मोठे योगदान सर्व मान्यवरांनी केले एक स्वरात अभिनंदन
नागपूर :- शहरातील समस्त नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिका ही अहो रात्र कार्य करणारी लोकाभिमुख संस्था आहे. अशा संस्थेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधणे शक्य झाल्याने शहराच्या विकासाला गती मिळाल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकास कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांचा गौरव करण्याकरिता शुक्रवार (ता. ३०) रोजी ‘सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या पत्नी संथी राधाकृष्णन बी., सर्वश्री आमदार कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, आ. विकास ठाकरे, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, राज्य महिला आयोग सदस्य आभा पांडे, माजी सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, माजी विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, जमाल सिद्दीकी, जितेंद्र घोडेस्वार, माजी अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात नागपूर शहराला कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीतून उभारण्यास आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे मोठे योगदान असल्याचा एकस्वर काढीत उपस्थिती सर्व मान्यवरांनी आयुक्तांचे अभिनंदन केले. तसेच शहराच्या विकास कामांना चालना देण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केलेल्या सर्व सकारात्मक कार्यबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली. यावेळी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय मनपा अधिकाऱ्यांकडून शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत त्यांचा सत्कार करण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करतांना राधाकृष्णन बी. म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांसाठी थेट कार्य करणाऱ्या मनपा सारख्या संस्थेत काम करण्याची संधी मिळणे ही आनंदाची बाब आहे. मनपात कार्यरत अधिकाऱ्यांकडे नागरिक आपले काम होईल ही अपेक्षा ठेवून आपल्या समस्या घेऊन येतात. मनपात काम करताना दररोज वेगळं काही शिकायला मिळते. मी जेव्हा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा कोरोनाचे मोठे संकट शहरावर ओढवले होते. मृत्यू संख्या वाढत होती, त्यामुळे दैनंदिन मृत्यू संख्या कमी करणारे हे आव्हान पुढे ठेवून कोरोनाला प्राथमिकता देत कार्य केले. यात तत्कालीन पदाधिकारी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली. काम करण्याची संधी मिळाली, अधिकाऱ्यांनी विश्वास ठेवला. पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वयसाधता आला, यामुळे विकासकार्यात मदत मिळाली. असे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की, आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पदभार स्वकारला तेव्हा त्यांच्या पुढे कोरोनाचे मोठे आव्हान होते. त्याकाळात आयुक्तांनी शासन, प्रशासन, जनप्रतिनिधी, कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक यांच्यात उत्तम समन्वय साधत कार्य केले. परिणामी नागपूर शहराला कोरोनाच्या भयावह परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत मिळाली. नंतरच्या काळात देखील आयुक्त यांनी आपल्या अनोख्या कार्य शैलीमुळे शहराला विकासाच्या मार्गावर आणले. पर्यावरणपूरक कार्यास प्राधान्य देत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. असे म्हणत आमदार कृष्णा खोपडे यांनी राधाकृष्णन बी. यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, जनप्रतिनिधी आणि प्रशासन हे एकमेकास पूरक आहेत. विकासाचा गाडा ओढण्यासाठी जनप्रतिनिधी आणि प्रशासन हे दोन्ही चाक व्यवस्थित चालणे गरजेचे आहे. या दोन्ही बाबींचा उत्तम समन्वय आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी साधला. आपल्या कार्यातून आयुक्तांनी अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. शिक्षण, परिवहन, महसूल, पर्यावरण आदी सर्व विषयांवर त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. कोरोनातील कामाची तर गणनाच होऊ शकत नाही. पालकत्वाची भावना ठेऊन त्यांनी अनेक जनहिताय कामांना मंजूर प्रदान केले. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी कार्य केले. परिणामी नागपूर शहराला केंद्र आणि राज्यशासनाचे विविध प्रतिष्टीत पुरस्कार प्राप्त झाले. व्यक्तीने आयुष्यभर विद्यार्थी राहिल्या हवं, असे म्हणता, ते देखील परदेशात शिक्षणासाठी जात आहेत. शिक्षण पूर्ण करून नागपुरात परत याव अशी मनीषा श्री. तिवारी यांनी व्यक्त केली. तर तानाजी वनवे आणि आभा पांडे यांनी राधाकृष्णन बी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मनपाचे माजी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनात केलेल्या विविध कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. तर आभार उपायुक्त सुरेश बगळे यांनी मानले.
कार्यक्रमात मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख महेश धामेचा, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता अजय मानकर, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक संचालक नगर रचना प्रमोद गावंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, घनश्याम पंधरे, विलीन खडसे, किरण बगडे, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माजी नगरसेवक सर्वश्री प्रकाश भोयर, संजय बंगाले, सुनील अग्रवाल किशोर कुमेरिया, ॲड. धर्मपाल मेश्राम, जितेंद्र (बंटी) कुकडे, नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रदीप पोहोणे, विजय (पिंटू) झलके, मनोज सांगोळे, सुनील हिरणवार, किशोर जिचकार, दिनेश यादव, निशांत गांधी, जुल्फेकार भुट्टो, राजेंद्र सोनकुसरे, भगवान मेंढे, माजी नगरसेविका रिता मुळे, संदीप डेव्हलपर्सचे गौरव अग्रवाल, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, मेहुल कोसुरकर, नागपूर@२०२५चे मल्हार देशपांडे आदींची विशेषत्वाने उपस्थिती होती.