भाजपाच्या संकल्प पत्रामधून विकसित ,समृद्ध भारताची हमी ‘फिर एक बार मोदी सरकार’ स्थापन होणारच – केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा विश्वास

मुंबई :- ‘मोदी की गॅरंटी’ म्हणजेच गॅरंटी पूर्ण होण्याची हमी असते हा विश्वास सर्वसामान्य जनतेला असल्याने जनता पुन्हा तिस-यांदा भाजपा-एनडीए सरकारला आशीर्वाद देणार आणि ‘फिर एक बार मोदी सरकार’ स्थापन होणार असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीचे ‘संकल्प पत्र-2024’ जाहीर झाल्यानंतर प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. 2047 सालापर्यंत भारताला विकसित व समृद्ध बनवण्यासाठी मजबूत व सक्षम सरकारची आवश्यकता आहे आणि भाजपा-एनडीए सरकारशिवाय दुसरा पर्यायच नाही असे ही गोयल म्हणाले.

गोयल म्हणाले की, भाजपाचे लोकसभा निवडणूक 2024 साठीचे संकल्प पत्र हे विकास, विरासत व गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर भर देत तयार केले आहे. हे संकल्प पत्र समाजाच्या सर्व वर्गांना डोळ्यापुढे ठेवून तयार केले आहे. युवा, शेतकरी, महिला, गरीब, ज्येष्ठ नागरिक, छोटे व्यापारी, कामगार अशा सर्वांचा विचार यात करण्यात आला आहे. मागच्या 10 वर्षांत गरीब कल्याण आणि समाजातील प्रत्येक वर्गाचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आखलेल्या मोदी सरकारच्या योजनांचा आणि त्यामुळे नागरिकांना झालेल्या लाभाची विस्तृत आकडेवारी गोयल यांनी सर्वांसमोर मांडली. युवावर्ग, शेतकरी, महिला व शोषित, वंचित गोरगरीब या सर्वांना प्रतिष्ठा व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्न, उज्वला योजनेमुळे 10 कोटींहून अधिक महिलांचे आरोग्य सुधारले, 14 कोटी कुटुंबांना जल जीवन मिशनअंतर्गत पिण्याचे पाणी या आणि इतर असंख्य योजनांचा लाभ झाल्याने आज 25 कोटी जनता ही दारिद्र्य रेषेच्या वर आल्याचे ही गोयल यांनी सांगितले.

मागच्या 10 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकावर पोहोचली असून भारत हे जागतिक उत्पादनाचे केंद्र बनले. मोदी सरकारने 2014 आणि 2019 मध्ये दिलेली बहुतांश आश्वासने पूर्ण केली असेही गोयल यांनी नमूद केले. राम मंदिर निर्माण, 370 कलम रद्द करणे, ट्रिपल तलाक रद्द करणे, नारि शक्ति वंदन कायदा, नागरिकत्व सुधारणा कायदा ही त्यातील काही निवडक उदाहरणे असल्याचे ते म्हणाले.

मोदी सरकारने मागच्या 10 वर्षांत 4 कोटी गरीब जनतेला पक्की घरे दिली असून अजून 3 कोटींना घरे देण्याची हमी संकल्प पत्रातून मोदींनी दिली आहे. भौतिक, डिजिटल, सामाजिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य, भारताची अर्थव्यवस्था जगात तिस-या क्रमांकावर आणणे, 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना आयुष्मान योजनेचे लाभ, गरिबांसाठी मोफत धान्य योजना पुढील 5 वर्षे चालू , सूर्यघर योजनेचा विस्तार, उज्ज्वला गॅस योजनेचा पाईप गॅस योजनेपर्यंत विस्तार, 2 कोटी छोट्या शेतकऱ्यांसाठी श्रीअन्न योजनेचा विस्तार ,3 कोटी लखपती दीदींचे लक्ष्य,मुद्रा योजनेंतर्गत कर्जाची रक्कम दहा लाखावरून वीस लाखापर्यंत करण्याची हमी या संकल्प पत्राने दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींना भारताला भ्रष्टाचारमुक्त, अमलीपदार्थ मुक्त करायचे असून त्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे गोयल म्हणाले. 2024 ची ही निवडणूक आपल्या देशाचे भाग्य ठरवणारी असून विकसित भारतासाठी केंद्रात तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतातील भाजपा- एनडीए सरकार निवडून देण्याचे आवाहन गोयल यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे मिरवणूक यशस्वी

Mon Apr 15 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 14 एप्रिल रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने आणि जल्लोषाने साजरी व्हावी तसेच 14 एप्रिल च्या सायंकाळी निघणारी मिरवणूक ही यशस्वी पार पडत वाहतूक व्यवस्थेत कुठलीही कोंडी निर्माण न होता सुरळीत वाहतुकीसह अम्ब्युलेन्स तसेच अत्यावश्यक सेवेत कुठलाही अडथळा निर्माण न होता सर्वाना सोयीचे व्हावे व कायदा ,सुव्यवस्था नियंत्रणात राहावे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com