नागपूर : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, नागपूर व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याकरिता व उद्योजकांना योग्य व कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्याकरिता 2 मार्चला सकाळी दहा वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उमेदवारांना उपलब्ध करून देणे व उद्योजकांना कुशल मनुष्यबळ प्राप्त करुन देणे हा या रोजगार मेळाव्याचा उद्देश आहे. या मेळाव्यात नागपूर विभाग व विभागाबाहेरील मोठ्या कंपन्या सहभागी होणार आहे. या कंपन्यामध्ये फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, सीएनसी ऑपरेटर, मशिनिस्ट, आरोग्य, ऑटोमोबाईल, बँकींग, सेल्समन, इंजीनीयरिंग आदी पदे भरावयाची आहेत. विभागातील इच्छुक बेरोजगार युवकांनी मेळाव्यात उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा.
इच्छुक युवक व युवतींनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या सेवायोजन कार्डवरील नोंदणी क्रमांक व पासर्वडचा वापर करून लॉग इन करावे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडून जिल्हा निवडावा व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनीची निवड करून मेळाव्याकरीता नोंद करावी. तसेच उद्योजकांनीसुध्दा मनुष्यबळ प्राप्त करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर पदे अधिसूचीत करावी व मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय नागपूर कार्यालयाच्या 0712-2565479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त प्र. वि. देशमाने यांनी केले आहे.