आज सावनेर क्रीडा संकुलातील क्रीडाप्रेमींनी खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन देत क्रीडा संकुलासाठी दोन सेट कबड्डी मॅट आणि एक सेट कराटे मॅट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. युवक कॉंग्रेस सावनेर कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली. यावेळी राहुल धोंगडे, सौरभ सबले, अजय महाजन, रूपेश कमाले, तुषार गायकवाड, मृणाल हरडे, मनीष रुशिया आणि पंकज महंत उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सावनेर शहरात विदर्भ स्तरावर कबड्डी स्पर्धांचे नियमित आयोजन केले जाते, ज्यामुळे अनेक नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. मात्र, क्रीडा संकुलात आवश्यक सामग्रीचा अभाव असल्याने अशा स्पर्धांच्या आयोजनात अडथळे येत आहेत. मागील वर्षी कबड्डी स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने यावर्षीही स्पर्धांचे आयोजन होण्याची अपेक्षा आहे.
क्रीडाप्रेमींच्या मते, या मॅट्सच्या उपलब्धतेमुळे स्थानिक खेळाडूंना आधुनिक आणि सुरक्षित क्रीडा सुविधा मिळतील, ज्याचा त्यांच्याच कामगिरीवर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे केवळ सावनेरच नव्हे, तर परिसरातील युवकांमध्येही खेळाचे वातावरण अधिक जोमाने वाढेल. त्यांनी दोन सेट कबड्डी मॅट्स आणि एक सेट कराटे मॅट लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली, जेणेकरून क्रीडाक्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल.