मुंबई :- सोलापूर जिल्हातील चारा छावण्या प्रलंबित अनुदान मागणी प्रस्तावासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय आल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जयंत पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.
मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांच्या प्रलंबित अनुदान मागणी बाबतचे प्रस्ताव संबंधितांकडून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांना सादर करण्यात आलेले आहेत. परंतू अनेक त्रुटी अहवालात आढळून आल्या आहेत. त्यामुळे राज्य कार्यकारी समितीच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करून तहसिलदार कार्यालयाने अनुदान मागणी केली नाही, असे जिल्हाधिकारी, कार्यालय सोलापूर यांनी कळविले आहे. त्याबाबतची पडताळणी करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या स्तरावर सुरू आहे. जिल्हाधिकारी सोलापूर, यांचेकडून याबाबतचा सुधारित प्रस्ताव प्राप्त होताच, सदर प्रस्ताव मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये निर्णयार्थ ठेवून पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण येथील चारा छावण्यांच्या प्रलंबित अनुदानाबाबत अहवाल मागवून निधी देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.