– अमृत भारत योजनेत मोर्शी वरुड तालुक्यातील रेल्वे स्थानकांचा समावेश करण्याची मागणी !
मोर्शी :- मोर्शी वरूड तालुका विवीध तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळ तसेच विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्रा मोसंबी व भाजीपाला मालवाहतुकीसाठी व प्रवाश्यांच्या सोईसाठी मोर्शी वरूड तालुक्यातील संपूर्ण रेल्वे स्थानकाचा भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्थानक ‘ योजनेत सामावेश करून मोर्शी, रिद्धपूर, पाळा, हिवरखेड, बेनोडा, वरूड, पुसला, यासह विविध रेल्वे स्थानकांचा प्राधान्याने विकास करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, वर्धा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे, अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे केली आहे.
भारतीय रेल्वे देशभरातील २४७ स्थानकांची पुनर्विकासासाठी निवड करणार आहे. रेल्वे प्रशासन प्रत्येक रेल्वे विभागातून प्रत्येकी दोन स्थानक निवडून त्यांचा विकास पहिल्या टप्प्यात करणार आहे. त्यासाठी मोर्शी वरूड तालुक्यातील संपूर्ण स्थानकाचा विकास प्राधान्याने करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
भारतीय रेल्वे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत एक हजार छोट्या रेल्वे स्थानकांचा विकास करणार आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक विभागातून १५ स्थानके निवडण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वे विभागाने मोर्शी वरूड स्थानकाचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा, मोर्शी वरूड स्थानकाचा विकास करुन सर्व सोई सुविधा युक्त रेल्वे स्टेशन निर्माण करून शेतमाल साठवणुकीसाठी गुड्स शेड उभारून गुड्स फलाट बांधावे. तसे केल्यास मोर्शी वरूड स्थानकात कोल्ड स्टोरेज कार्यान्वित केल्यास संत्रा मोसंबी व भाजीपाला शेतमालाची वाहतूक करण्यास मदत होणार आहे.
मोर्शी वरूड या स्थानकात शेगाव शिर्डी व इतर तीर्थक्षेत्रासाठी जाणारे भाविक मोठ्या प्रमाणात असतात. तसेच या परिसरात शेतमालाची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने या स्थानकांचा विकास प्राधान्याने करण्याची नितांत आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने सुरु केलेल्या अमृत योजनेमध्ये या स्थानकांचा समावेश करून त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये दोन खासदार असतांना वरूड मोर्शी रेल्वे स्टेशनवर आवश्यक रेल्वे गाड्यांचे थांबे देऊन या स्टेशनचा विकास करणे गरजेचे होते. ज्या स्टेशनवर सुविधा नाही त्या स्टेशनवर चांगल्या सुविधा पुरविणे हे प्राधान्य असले पाहिजे. मात्र मोर्शी वरूड तालुक्याला या आधी सुद्धा दोन खासदार मिळाले असून मोर्शी वरूड तालुक्यातील रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेत समावेश न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मोर्शी वरूड तालुक्यातील रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश करण्यासाठी दोन्ही खासदारांना अपयश आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
– विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ मानण्यात येते. दरवर्षी सुमारे अडीच लाख टन संत्री बांगलादेशमध्ये निर्यात करण्यात येतात. विदर्भातून बांगलादेशपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी साधारणत: ७२ तास लागतात. तर रेल्वेमार्गाने हेच अंतर ३६ तासात पार करता येणे शक्य आहे. जर माल लवकर पोहोचला तर त्याची गुणवत्ता कायम राहील व वाहतुकीचा खर्चदेखील कमी होईल व मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना या रेल्वे स्थानकांवर सोई सुविधा निर्माण होईल यासाठी अंतर्गत मॉल्स, सिटी सेंटर, ऑरेंज फूड मॉल्स, रुफ प्लाझा, शॉपिंग झोन, कनेक्टिव्हिटी चे मल्टी मॉडेल इत्यादी सुविधा निर्माण करून मोर्शी वरूड तालुक्यातील रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश करावा.
– रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका .