मुंबई :- सहकार आयुक्तालयांतर्गतच्या पतसंस्था गावोगावी उभारण्यासाठी नवीन निकष तयार करण्यात येत आहेत. यासंदर्भातील नियमावली अंतिम झाल्यावर निकषांत बसणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती, सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
पतसंस्थांच्या कार्यक्षेत्रात वाढ व शाखा विस्तार प्रस्तावांच्या अनुषंगाने सदस्य जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री अतुल सावे बोलत होते.
मंत्री अतुल सावे म्हणाले, पतसंस्थांची नोंदणी, कार्यक्षेत्र वाढ आणि शाखा विस्तार याबाबत नवीन निकष निश्चित करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक गावात पतसंस्था करण्यासाठी निकषांचे पालन करणाऱ्या संस्थांना परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
मल्टीस्टेट बॅंकेत गैरव्यवहार झाला असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करणार. याचबरोबर अडचणीत पतसंस्था गेल्यास ठेवीदारांचे नुकसान होऊ नये यासाठी विमा काढण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आल्याचे मंत्री सावे यांनी उपप्रश्नास उत्तर देताना सांगितले.
यावेळी सदस्य एकनाथ खडसे, प्रा. राम शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.