Ø मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Ø आता विविध ठिकाणी लाभार्थी नोंदणी
Ø ग्रामपंचायतस्तरावर 1205 समित्या नेमणार
यवतमाळ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक गतिमान करण्यासोबतच नोंदणीचे काम कालमर्यादेत पुर्ण करण्यासाठी ग्रामस्तरावर समित्या नेमल्या जात आहे. या समित्या लाभार्थ्यांची नोंदणी करून याद्या प्रसिद्ध करतील. याद्या अचूक आणि कालमर्यादेत पुर्ण करण्यासाठी या समित्या महत्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर 1 हजार 205 समित्या नेमल्या जाणार आहे.
योजनेची घोषणा केल्यानंतर नोंदणीसाठी कमी कालावधी असल्याने तहसिल कार्यालयांमध्ये दाखले, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे शासनाने नोंदणीसाठी कालावधी वाढविला असून कागदपत्रांमध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहे. शहर व ग्रामीण भागात महिलांची नोंदणी गतीने होण्यासाठी तालुका व ग्रामस्तरावर समित्या स्थापन करून त्याद्वारे नोंदणीचे काम अचूनकपणे करण्याचे सुधारीत आदेश शासनाने निर्गमित केले आहे.
सुधारीत आदेशाप्रमाणे ग्रामस्तरावर ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या समितीत समावेश राहणार आहे. ग्रामसेवक समितीचे संयोजक तर संगणवाडी सेविका सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. या समितीच्यावतीने गावपातळीवर शिबिरे आयोजित करून त्याठिकाणी योजनेचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज नंतर ॲप, पोर्टलवर भरण्यात येणार आहे.
ग्रामस्तरीय समितीमार्फत लाभार्थ्याची यादी प्रत्येक शनिवारी व आवश्यक्तेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येतील तसेच यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी येथे प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती असल्यास त्याचे निराकरणे देखील गावस्तरावरच केले जाणार आहे. शहरी भागात वार्डस्तरीय समित्यांद्वारे याद्या तयार करण्याचे काम केले जात आहे.
सुरुवातीस केवळ अंगणवाडी सेविका व सेतू केंद्राद्वारे अर्ज ऑनलाईन, ऑफलाईन भरण्याची सुविधा होती. एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये आणि अर्ज भरण्याचे काम सुटसुटीतपणे, गतीने आणि कालमर्यादेत पुर्ण व्हावे यासाठी शासनाने आता नागरी व ग्रामीण भागाकरीता बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, जीवनोन्नती अभियानाचे समूह संघटक, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र यांना देखील प्राधिकृत केले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे काम अधिक गतीने होणार आहे.
लाभार्थी नोंदणीसाठी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता
सुरुवातीस शासनाने केवळ अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांची नोंदणी करण्यासाठी प्रति लाभार्थी 50 रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता जाहीर केला होता. आता अर्ज भरण्यासाठी विविध घटकांना प्राधिकृत करण्यात आले आहे. प्रत्येक घटकास लाभार्थी महिलांची नोंदणी झाल्यानंतर प्रती पात्र लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.