– ‘मेरी माटी, मेरा देश’; झोनस्तरावर घराघरातून माती/तांदूळ संकलन
नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाद्वारे शहरातून माती/तांदूळ संकलनाला सुरुवात झाली असून, सोमवार १८ सप्टेंबर पासून शहरातील विविध भागातून ‘अमृत कलश यात्रेचा’ शुभारंभ होणार आहे. यादरम्यान शहरात दहाही झोनस्तरावर प्रत्येक प्रभागामध्ये घराघरांतून माती/तांदूळ संकलीत करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या महत्वाच्या ‘अमृत कलश यात्रेचा’ शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार असून, मनपाच्या दहाही झोन कार्यालयांद्वारे हर्षोल्लासात ‘अमृत कलश यात्रा’ काढली जाणार आहे. यात लकडगंज झोन अंतर्गत संत जगनाडे महाराज चौक येथे सकाळी ११ वाजता आणि नंतर लकडगंज झोन कार्यालय येथून आमदार कृष्णा खोपडे, सतरंजीपुरा झोन अंतर्गत गोळीबार चौक येथून सकाळी ११ वाजता आमदार विकास कुंभारे, गांधीबाग झोन अंतर्गत महाल येथील राजे रघुजी भोसले नगरभवन (टाऊन हॉल) येथे सकाळी १० वाजता आणि धंतोली झोन अंतर्गत गांधी सागर तलाव विसर्जन स्थळ येथे सकाळी ११ वाजता आमदार प्रवीण दटके, लक्ष्मीनगर झोन अंतर्गत आठ रस्ता लक्ष्मीनगर चौक येथे सकाळी ९ वाजता माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते होणार असून, यावेळी माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, गणमान्य व्यक्ती इतर मान्यवर उपस्थित राहतील. याशिवाय धरमपेठ झोन कार्यालय येथे सकाळी १० वाजता, हनुमान नगर झोन कार्यालय येथे सकाळी ११ वाजता. आशीनगर झोन अंतर्गत इंदोरा चौक येथे सकाळी १० वाजता. मंगळवारी झोन कार्यालय येथे सकाळी ११ वाजता ही अमृत कलश यात्रा काढण्यात येईल.
यात्रे दरम्यान घराघरांमधून नागरिकांकडून माती किंवा तांदूळ संकलीत केले जातील तसेच संकलीत झालेले माती किंवा तांदळाचे कलश नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये सन्मानपूर्वक हर्षोल्हासात आणले जातील. मनपा मुख्यालयातून दहाही झोनमधील कलश एकत्र करून संपूर्ण नागपूर शहराचे ते कलश राज्याची राजधानी मुंबई येथे पाठविण्यात येतील. मुंबई येथून संपूर्ण राज्याचे कलश देशाची राजधानी दिल्ली येथे कर्तव्यपथ वर पाठविली जाईल.
या उपक्रमामध्ये शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, त्यांच्या परिसरामध्ये येणा-या अमृत कलश यात्रेमध्ये सहभागी होउन माती/तांदूळ संकलीत करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.