– मल्टिप्लेक्स व सिनेमागृहांमध्ये दाखवल्या जाणार नागपूर पोलिसांच्या जागृतीपर चित्रफिती
नागपूर :- नागपूर शहर पोलिस व प्रकृति ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महिला दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महिला व बालकांची सुरक्षा व सशक्तीकरणासाठी दिलेल्या योगदानाकरिता शहरातील पाच महाविद्यालयाच्या प्राचार्या व काही स्वयंसेवी नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल, सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभार), डॉ शिवाजी राठोड, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रभार) आणि प्रकृति संस्थेच्या वासंती बेटगर मंचावर उपस्थित होत्या.
” शहराला अधिक सुरक्षित बनविण्यासाठी आजच्या सत्कारमूर्ती महिलांनी जे योगदान दिलं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. हा कार्यक्रम आयोजित करताना अत्यंत आनंद झाला. ” पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल त्यांच्या वक्तव्यात म्हणाले. शहराला गुन्हे-मुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य किती मोलाचे आहे यावर त्यांनी भर दिला. ” सुरक्षा समिती आणि यंग इंडिया अनचेन्ड हे पोलीस दीदींना बळ देतात. ” सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे महिलांमध्ये जागरूकतेची महत्व सांगताना म्हणाल्या. संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनीसुद्धा संबोधन केले.
शहरातील पाच महाविद्यालयांना यंग इंडिया अनचेन्ड उपक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षेच्या दिशेने भरीव कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले. डॉ स्वाती धर्माधिकारी, प्राचार्या, तिरपुडे समाजकल्याण महाविद्यालय ; डॉ प्रिया राऊत, प्राचार्या, दत्ता मेघे आयुर्वेदीक वैद्यकीय महाविद्यालय ; रूपा वर्मा, प्राचार्या, सीताबाई नरगुडकर नर्सिंग कॉलेज, डॉ शारदा नायडू, प्राचार्या, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय व शिल्पा सरोड, एल ए डी व रत्नीदेवी पुरोहित कॉलेज यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकार केले. यंग इंडिया अनचेन्ड हा उपक्रम नागपूर शहर पोलीस व प्रकृति ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गेली दोन वर्षे राबविला जातो आहे. शहरातील तीस महाविद्यालयातील विद्यार्थी सुरक्षा व गुन्हेगारी प्रतिबंधाच्या कार्यात याद्वारे जोडले गेले आहेत.
सुरक्षा समिती चे स्वयंसेवी नागरिक, मीनाक्षी धडाडे, अंबाझरी ; शहनाझ शेख, हिरवी नगर ; वैशाली चौरे, जरीपटका ; अलका उईके, बाबुलखेडा यांना सामुदायिक पोलिसिंग मधील कामगिरीकरिता सन्मानित करण्यात आले. सीताबाई नरगुडकर नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थिनी भाग्यश्री दुबे, दिव्या फुंडे, सिमरन यादव व भारती तिरबुडे यांनी काही दिवसांपूर्वी एका नागपूरकराचे प्राण वाचविले होते, त्यांचा यानिमित्त गौरव करण्यात आला. नागपूर शहर पोलीस व प्रकृति ट्रस्ट द्वारे शहरात पन्नास सुरक्षा समितींची सुरुवात करण्यात आलेली आहे. या समितींच्या माध्यमातून जागरूक नागरिक शहर सुरक्षेत पोलिसांना सहकार्य करतात.
कार्यक्रमादरम्यान नागपूर पोलीस व प्रकृति ट्रस्ट द्वारे निर्मित दोन माहितीपट प्रदर्शित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या माहितीपटांचे अनावरण करण्यात आले होते. मानव तस्करी, लैंगिक शोषण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर व पोलीस दीदी, पोलीस काका यांची भूमिका या विषयांवर हे माहितीपट आहेत. व्ही आर मॉल येथील सिनेपोलिस या मल्टिप्लेक्स मध्ये चित्रपट प्रदर्शनादरम्यान हि माहितीपटे दाखविली जाणार आहेत. सिनेपोलिस चे चेतन कुमार जाधव यांना माहितीपटाची प्रत देण्यात आली.
डीसीपी निमिष गोयल, बाल कल्याण समितीच्या छाया गुरव, महिला व बाल कल्याण विभागाच्या अपर्णा कोल्हे, डॉ अनघा मोरे, शहर पोलिसांच्या मानव तस्करी प्रतिबंधक दलाचे कर्मचारी, भरोसा सेल, जिल्हा बाल संरक्षण युनिट चे कर्मचारी तसेच यंग इंडिया अनचेन्ड उपक्रमात सहभागी महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यार्थी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आसावरी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व डीसीपी अश्विनी पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.