राजभवन येथे आंतरराष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

अपस्मार व्यवस्थापनासाठी योग तसेच फिजिओथेरपीची देखील मदत घ्यावी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

अपस्मार व्यवस्थापन कार्यासाठी राज्यपालांकडून डॉ निर्मल सुर्या यांचा सत्कार

मुंबई :- अपस्मार किंवा आकडी येणे ही गंभीर समस्या असून योग्य औषधोपचाराने त्यावर मात करता येते. अपस्मार व्यवस्थापनासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांनाकडून वेळीच उपचार करून घ्यावे तसेच त्यासाठी योग व फिजिओथेरपीची देखील मदत घ्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

आंतरराष्ट्रीय अपस्मार दिनाचे औचित्य साधून एपिलेप्सी फाउंडेशन या संस्थेने राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मदतीने राज्यभर घेतलेल्या १०० अपस्मार शिबिरांची माहिती देणाऱ्या एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. १३) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रकाशन सोहळ्याला खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री छगन भुजबळ, एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ मज्जाविकार तज्ज्ञ डॉ निर्मल सुर्या, चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा, फाउंडेशनचे विश्वस्त यांसह अपस्मार ग्रस्त व्यक्ती व लहान मुले उपस्थित होते. अपस्मार या आजारावर जनजागृती करण्याच्या हेतूने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आंतरराष्ट्रीय अपस्मार दिवसाचे आयोजन करण्यात येते.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन अपस्मार रुग्णांसाठी सर्वंकष तपासणी व शिबिरे आयोजित करून तसेच रुग्णांवर मोफत औषधोपचार करून एपिलेप्सी फाउंडेशन दैवी कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. आगामी पाच वर्षात फाउंडेशनने सध्याच्या दुप्पट अपस्मार रुग्णांना सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवावे असे आवाहन राज्यपालांनी केले. एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ निर्मल सुर्या यांनी एपिलेप्सी फाउंडेशनचे कार्य राष्ट्रीय स्तरावर न्यावे व त्या माध्यमातून देशातील अपस्मारीच्या अधिकाधिक रुग्णांना लाभ व्हावा अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली.

चप्पल, कांदा सुंगवणे बंद करा

अपस्मारीचा झटका (फिट) आलेल्या रुग्णाला कांदा किंवा चामड्याची चप्पल सुंगवणे अज्ञानमूलक असून रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळीच योग्य औषधोपचार घेतले पाहिजे असे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. डॉ निर्मल सुर्या यांनी अपस्मार रोगनिदान व उपचारासाठी सिंधुदुर्ग ते गोंदिया – गडचिरोली येथपर्यंत केलेले वैद्यकीय सेवाकार्य मौलिक असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

१०० मोफत शिबिरांमधून ३४००० रुग्णांवर उपचार

जगाच्या लोकसंख्येपैकी ५ कोटी लोकांना अपस्मारीचा त्रास असून भारतात अपस्मारीचे १.३० कोटी रुग्ण आहेत तर महाराष्ट्रामध्ये ११ लाख रुग्ण आहेत. योग्य औषधोपचाराने यापैकी ७० ते ८० टक्के लोक बरे होऊ शकतात असे एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ निर्मल सुर्या यांनी सांगितले. राज्यात फाउंडेशनने आरोग्य राष्ट्रीय अभियानाच्या सहकार्याने घेतलेल्या १०० शिबिरांमधून ३४००० रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते यावेळी अपस्मार व्यवस्थापन व रुग्ण सेवा क्षेत्रातील सहकार्याबद्दल प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, डॉ निर्मल सूर्या, आनंद राठी, डॉ नरेंद्र मेहता, बापूजी सावंत, डॉ गायत्री हट्टंगडी, डॉ आरती शर्मा, नाझिया अन्सारी, हेमंत कुलकर्णी, राहुल आमडस्कर, डॉ अशोक थोरात व डॉ नवीन सूर्या यांना सन्मानित करण्यात आले. अपस्मार ग्रस्त लहान मुलांनी यावेळी राज्यपालांना स्वतः तयार केलेल्या भेटवस्तू दिल्या.

फाउंडेशनचे विश्वस्त डॉ नवीन सूर्या यांनी आभारप्रदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपातर्फे अनुकंपा धारकांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध ,१५ दिवसांच्या आत नोंदविता येणार आक्षेप

Tue Feb 14 , 2023
चंद्रपूर  :- चंद्रपूर शहर महानगरपालिका अनुकंपा धारकांना सुचित करण्यात येते की,चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील मंजुर आकृतीबंधानुसार शासन नियमानुसार रिक्त असलेली पदे नामनिर्देशनाद्वारे अनुकंपा उमेदवारांमधुन भरण्याबाबत चंद्रपूर शहर महानगरपालिका विचाराधीन असल्याने दिनांक १ जानेवारी २०२२ चे तारखेवर आधारीत पात्र / अपात्र अनुकंपा धारकांची प्राथमीक स्वरूपाची प्रतीक्षा यादी महानगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली असुन याबाबत काही आक्षेप असल्यास आक्षेप नोंदविण्याचे आवाहन चंद्रपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com