अंकित तिवारी यांचे लाईव्ह कॉन्सर्ट
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप रविवारी २२ जानेवारी २०२३ रोजी यशवंत स्टेडियम येथे होणार आहे. या समारंभात सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक अंकित तिवारी यांचे लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. संपूर्ण कार्यक्रम नि:शुल्क असून कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या प्रवेशिका खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉलमधील मुख्य कार्यालय आणि यशवंत स्टेडियममध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. इच्छुकांनी दोन्ही ठिकाणाहून प्रवेशिका घ्याव्यात, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वात खेळाडूंना नोंदणी आणि इतर माहितीसाठी सुलभ प्रदान करण्याच्या उद्देशाने खासदार क्रीडा महोत्सवाचे शहरात विविध ठिकाणी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. महोत्सवाचे मुख्य कार्यालय सीताबर्डी येथील ग्लोकल मॉलमध्ये आहे. ८ जानेवारीपासून शहरातील सुमारे ६२ मैदानांवर खासदार क्रीडा महोत्सवाच्या विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. नागपूर शहरासह विदर्भातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ देणारा हा महोत्सव मध्य भारतातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेमुळे नागपूर शहरातील अनेक प्रतिभावंत खेळाडूंना महोत्सवाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ मिळालेले आहे. १५ दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवाचा रविवारी समारोप होणार असून या समारंभाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही संदीप जोशी यांनी केले आहे.
इथून मिळवा प्रवेशिका
१. समारंभ स्थळ : यशवंत स्टेडियम, धंतोली
२. खासदार क्रीडा महोत्सव मुख्य कार्यालय : ग्लोकल मॉल, हल्दीराम समोर, सीताबर्डी