– स्वच्छ शौचालय मोहीमेला उत्तम प्रतिसाद
नागपूर :- जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने येत्या 25 डिसेंबरपर्यंत देशव्यापी “स्वच्छ शौचालय मोहीम” राबविण्याचे ठरविले असून, नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनपाद्वारे मोहिमेंतर्गत स्वयं सहायता समूह (SHGs) आणि स्वयंसेवी संस्था (NGO) यांच्या मार्फत शहरातील शौचालयाची प्रतवारी/वर्गवारी करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात ही मोहीम यशस्वीरित्या राबविल्या जात आहे. मनपा हद्दीतील सामुदायिक शौचालय आणि सार्वजनिक शौचालय अशा ९८ शौचालयांची दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन स्वयं सहायता समूह आणि स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांकडून सदर वर्गवारी करण्यात येत आहे.
शहरातील ३४ सामुदायिक शौचालय आणि ६४ सार्वजनिक शौचालयांची प्रतवारी/वर्गवारी करण्यासाठी स्वयं सहायता समूह आणि स्वयंसेवी संस्थांच्या ६९ सदस्यांना प्रत्येकी तीनच्या समूहात विभाजित करून त्यांच्या २३ गटांची स्थापना करण्यात आली असून, सदर समूह शौचालयातील पाण्याची पूर्तता, कार्यात्मकता, प्रवेश योग्यता, इको-फ्रेंडली, स्वच्छता, सुरक्षितता तपासून त्यांची प्रतवारी करीत आहे. यात मुख्यत्वे शौचालयातील पुरेशी वायू व्यवस्था, शौचालयातील बेसिन आणि साबणाची व्यवस्था, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रवेश द्वार, दिव्यांगांसाठी सुविधा, शौचालय दर्शक चिन्ह, कचरा कुंडीची तरतूद, महिलांसाठी सॅनिटरी पॅड आणि सुरक्षित डिस्पोजेबल सुविधेची उपलब्धता, शौचालयाच्या आवारात आणि बाहेर पुरेसा प्रकाश व्यवस्था, केअर टेकरची उपस्थिती, तक्रार नोंदणी यंत्रणा या बाबींनुसार प्रतवारी करण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहिम अत्यंत महत्वाची असून, स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेत मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.