मुंबई :- ‘मुख्यमंत्री’ ही केवळ तांत्रिक व्यवस्था असून, मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी महायुती सरकारमध्ये आतापर्यंत एकत्रितपणे निर्णय घेतले आणि पुढेही राज्याच्या प्रगतीसाठी एकत्रित निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले. शिंदे, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केल्यानंतर या तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
फडणवीस म्हणाले, शिंदे व पवार यांनी मला मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याची विनंती राज्यपालांकडे केली आहे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रही दिले आहे. शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे व सर्वांचीच तशी इच्छा आहे. निवडणुकीआधी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू.
यावेळी शिंदे म्हणाले, हे सरकार खेळीमेळीच्या वातावरणात स्थापन होत आहे, याचा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असे मी गेल्याच आठवड्यात जाहीर केले होते. आम्ही तिघांनीही गेल्या अडीच वर्षांत जनतेसाठी बरीच महत्त्वाची कामे केली.
कोणीही छोटा किंवा मोठा नव्हता, तर आपण जनतेसाठी काय करणार, हे महत्त्वाचे होते. आम्ही एकत्रित व संघटितपणे काम केले. फडणवीस यांचा पुढील प्रवास राज्याचा विकास करणारा व सर्वसामान्यांना न्याय देणारा असेल.