मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यपालांच्या हस्ते डि. लिट. प्रदान

शिक्षणातील गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे विद्यापीठांना आवाहन

“महान लोकांच्या यादीत नाव जोडले गेले हा बहुमान” : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :-प्राचीन काळात भारत जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र होते व सातव्या शतकापर्यंत जगभरातील लोक भारतात अध्ययनासाठी येत. देशात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारखी ख्यातकीर्त विद्यापीठे होती. राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च शैक्षणिक संस्थांनी हे आपले शिक्षणातील गतवैभव पुनश्च प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यापीठे व शिक्षण संस्थांना केले. 

राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारोह विद्यापीठाच्या नेरुळ येथील शैक्षणिक संकुलात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

या दीक्षांत समारोहात राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनातील कार्याबद्दल डी.लिट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) ही मानद पदवी देण्यात आली.

लोकमत समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार व‍िजय दर्डा यांना देखील राज्यपालांच्या हस्ते माध्यम क्षेत्र, राजकीय योगदान व दातृत्वासाठी डी.लिट ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. 

डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाने स्थापनेपासून केलेल्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना राज्यपालांनी विद्यापीठाच्या वैद्यकीय, क्रीडा, व्यवस्थापन, नर्सिंग, फिजिओथेरपी, बायोटेक्नॉलॉजी, विधी व आदरातिथ्य क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. स्नातकांनी भावी वाटचालीत राष्ट्रकार्यात योगदान द्यावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

“महान लोकांच्या यादीत नाव जोडले गेले हा बहुमान” : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्या डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाने यापूर्वी डॉ रघूनाथ माशेलकर, आप्पासाहेब धर्माधिकारी, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, नारायण मूर्ती यांसारख्या श्रेष्ठ लोकांना डी.लिट. पदवी दिली आहे, त्या विद्यापीठाने आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला डी.लिट. देऊन त्यांच्या यादीत आपले नाव जोडले, हा आपला मोठा बहुमान असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

डॉ डी वाय पाटील हे शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असून त्यांनी शिक्षण एका ठराविक साचातून बाहेर काढले असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आपण नेहमी २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण केले असे सांगून आपण आजही कार्यकर्ता आहो व उद्याही कार्यकर्ता राहू असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री झाल्यावर आपण सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार व महिलांसाठी सर्वसमावेशक काम केले असे नमूद करून आपले नाव श्रीमंतांच्या यादीत येणार नाही, परंतु माणुसकीच्या यादीत निश्चितच येईल, असे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांमधील एकुण २४५२ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच. डी. तसेच सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ विजय पाटील, प्र-कुलपती शिवानी पाटील, कुलगुरु वंदना मिश्रा चतुर्वेदी, डॉ. नंदिता पालशेतकर यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मध्य नागपुरात आक्रमक मशाल मोर्चा

Wed Mar 29 , 2023
नागपूर :-लोकशाही ची मूल्ये तुडवत भांडवलशाही ची मूल्ये रुजवत असंविधानिक पद्धतीने काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल  गांधी यांची खासदारकी रद्द करण्याबद्दल आज मध्य नागपुरात आक्रमक मशाल मोर्चा राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके व शहर अध्यक्ष तैसीफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य नागपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नयन लालाजी तरवटकर यांच्या नेतृत्वात हा मशाल मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात प्रामुख्याने उपस्थित काँग्रेस कमिटीचे अप्पाजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!