मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली

– वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला

मुंबई :- आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राचे सांस्कृतिक क्षितीज उजळून टाकणारा अवलिया आपल्यातून निघून गेला आहे, अशा शोकपूर्ण भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कणेकर यांच्या निधनामुळे राज्याच्या कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, शिरीष कणेकर बहुआयामी-बहुपेडी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात पत्रकार, चित्रपट व क्रिकेट समीक्षक, ललित लेखक, एकपात्री कलाकार अशा एकाहून अनेक कला-गुणांचा दुर्मीळ असा मिलाफ होता. कणेकरांच्या हजरजबाबी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्वामुळे ते जिथे-जिथे जातील तिथे हास्याची लकेर उमटे. चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांतील अनेक घडामोडींचा त्यांचा बारकाईने अभ्यास असे. विसंगती आणि किश्श्यांतून ते हास्याची कारंजी फुलवत राहिले. त्यांनी स्वतःला कुठल्याही क्षेत्राचे बंधन घालून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी अष्टपैलू खेळाडूसारखी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मैदानात कामगिरी करून ठेवली आहे. त्यांनी फटकेबाजीही केली आणि आणि विकेटही उडवल्या आहेत. अशी कामगिरी कुणी यापूर्वी केली नव्हती आणि यापुढेही शक्य नाही. स्तंभलेखन, पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यांनी चौफेर लेखन केले. त्यांच्या पुस्तकांची नावंही त्यांच्या मिश्किल आणि दिलखुलास स्वभावाप्रमाणे खट्याळ-अवखळ अशी वैशिष्ट्यपूर्ण राहिली आहेत. या साहित्यनिर्मितीतून, वैशिष्ट्यपूर्ण एकपात्री प्रयोगांच्या सादरीकरणातून त्यांनी विदेशातही लोकप्रियता मिळवली. यातूनही त्यांनी मराठी साहित्याचे वैभव, बहुविविधता जागतिकस्तरावर पोहचवली आहे. त्यांच्यासारखा अवलिया होणे नाही. त्यांच्या जाण्याने मराठी कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशा या बहुआयामी महाराष्ट्रसुपुत्राला ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठी लेखनात कणेकरी बाज रूजविणारा लेखक गमावला - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tue Jul 25 , 2023
मुंबई :- ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने खुमासदार लेखन करणारा शब्दप्रभू लेखक गमावला आहे. त्यांनी मराठीत कणेकरी बाजाचे लेखन रूजविले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “शिरीष कणेकर हे चित्रपट, क्रिकेटचे एका अर्थाने माहितीकोश होते. एखादा प्रसंग रंजक करून कसा सांगायचा, यावर त्यांची हुकूमत होती. शब्दांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com