‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त राज्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा संवाद

– मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाविद्यालयांची भूमिक मोलाची- श्रीकांत देशपांडे

पुणे :- मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा असून यात महाविद्यालयांनी मोलाची भूमिका बजावावी, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

‘मराठी भाषा गौरव दिन’ व ‘जागतिक एनजीओ दिना’निमित्त राज्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापकांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच वर्शिप अर्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, पुण्याच्या स्वीप समनव्य अधिकारी अर्चना तांबे यांच्यासह जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, स्वीप समनव्य अधिकारी, वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष पराग मते, व्यवस्थापकीय संचालक तेजस गुजराथी, निवडणूक साक्षरता मंडळ राज्य समन्वयक अल्ताफ पिरजादे तसेच व जिल्हास्तरीय समन्वयक तसेच विविध जिल्ह्यातील सुमारे ४५० मुख्याध्यापक, प्राचार्य, नोडल अधिकारी उपस्थित होते.

*निवडणूकीत विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक करणार*

यावेळी होणाऱ्या निवडणूकांमध्ये अभिनव कल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी त्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर त्यांना विविध बाबींसाठी स्वयंसेवक म्हणून कामाची संधी दिली जाणार आहे. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधी स्वयंसेवक म्हणून संधी दिल्या जाणार आहेत. त्याबद्दल त्यांना सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहेत.

देशपांडे पुढे म्हणाले, मागील वर्षभरात निवडणूक साक्षरता मंडळद्वारे मतदारनोंदणीसाठी तसेच अन्य उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना अद्यापही १० मार्चपर्यंत मतदार नोंदणी करू शकत असल्याचे सांगण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोग आणि शिक्षण विभाग यांच्यात दिल्ली येथे झालेल्या सामंजस्य कराराची सविस्तर माहितीही त्यांनी दिली.

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत घरोघरी भेटी दिल्या, यात विद्यार्थ्यांचाही सहभाग मोठा होता. या लोकसभा निवडणुकीवेळी राज्यातील सर्व जिल्ह्यात यासारखे घरोघरी भेटी, पथनाट्यांद्वारे जनजागृती, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी फिरत्या व्हॅनद्वारे जनजागृती करावी, यासाठी महाविद्यालयांना जिल्हाधिकारी आणि वर्शीप अर्थ फाऊंडेशनची मदत होईल.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी निवडणुकीत काय कामे करावी याबद्दल मार्गदर्शन करीत प्राचार्यांच्या प्रश्नांचे निरसन करत संवाद साधला. नोडल अधिकाऱ्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण सूचनांची दाखल घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

या ऑनलाईन बैठकीचे प्रास्ताविक गुजराथी यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ सल्लागारांनी नुकतेच मुंबई येथे भेट दिली असता निवडणूक साक्षरता मंडळाद्वारे आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन हे काम इतर राज्यातही नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे गुजराथी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिक्रमणाविरोधात वाहतुक पोलीस व मनपाची संयुक्त कारवाई  

Wed Feb 28 , 2024
– २० दुचाकी वाहने जप्त   – गाळेधारकांना नोटीस चंद्रपूर :- शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. दुकानासमोर पार्किंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com