नागपूर :- तुम्ही कसा आहार घेता यावर तुमचे आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे निरोगी राहायचे असेल तर बाजरी, ज्वारी आदी मिलेटसयुक्त आहाराचे सेवन करा आणि निरोगी रहा, असा सल्ला पद्मश्री डॉ. खादरवली यांनी दिला. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हेल्थ क्युअर विथचे अभय राजकारणे आणि डॉ.जी.राठी उपस्थित होते. कृषी, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात जगभर ख्यातीप्राप्त डॉ.वली म्हणाले, आजच्या काळात मोठ्या प्रमाणात शेतमाल उत्पादन होत आहे. हे सर्व रासायनिक आहे. दुध, गहू, तांदूळ, साखर हे आरोग्याला हानीकारक आहे. असे असताना आपण त्याचा सर्रास उपयोग करत आहोत. निरोगी राहायचे असेल तर जुन्या भारतीय पारंपारिक आहाराकडे वळणे गरजेचे आहे. यामध्ये कोदो, कुटकी (लिटिल मिलेट), कांगणी (फॉक्सटेल) भगर (बर्नयार्ड) आणि मुराद (ब्राऊन टाक) या पारंपारिक धान्यांचा उपयोग करणे गरजेचे आहे. हे धान्य पिकवणारे कर्नाटक राज्य अग्रेसर आहे. यासाठी संपूर्ण भारतात जनजागृती करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजाराचे मूळ कारण आहारच आहे. त्यामुळे आहार बदलण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हा बदल घडून आला तर रुग्णालयांची गरज भासणार नाही. या पाच पारंपारिक धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर, जीवनसत्वे, खनिजे, ऑटिऑक्सिडंट, फॅटी एॅसिडस् असतात. या आहारामुळे हृदयविकार, पचनक्रियेमध्ये सुधारणा, मधुमेह, हाडांचे आरोग्य, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी आपले आरोग्य सुदृढ होते. हा आहार लोकांनी घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचेही डॉ. खादरवली यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
साखर, दूध, तांदूळ, गहू, मांस, दुधापासून बनविलेल्या पदार्थांपासून अनेक आजार वाढतात. आपण सेवन करत असलेल्या अन्नातून आपणाला ग्लूकोज मिळत असते. त्यामुळे साखर खावून आजाराला निमंत्रण देऊ नये. दूध मानवासाठी नाहीच. तसेच सध्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण घाणीचे तेल सर्वात उत्तम. त्यामुळे घाणीत तयार केलेले शेंगदाने, जवस, तीळ तेलाचा वापर करावा, असा सल्लाही डॉ. वली यांनी याप्रसंगी दिला. आपले पूर्वज दीर्घायुषी होते. कारण ते नैसर्गिक आहाराचा वापर करत होते. त्यामुळे नैसर्गिक आहाराकडे भारतीयांनी वळणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. वली यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रशांनची उत्तरे दिली.