नागपूर :- केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण संग्रहण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या नवीन सचिवालय सिविल लाईन स्थित केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील तसेच मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी तसेच कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी एकीकृत कीड व्यवस्थापनावर मानव संसाधन विकास कार्यक्रमांतर्गत 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी नवीन सचिवालय भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी फरीदाबाद येथील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या संयुक्त संचालक स्मिता पांडे, केंद्रीय कापूस संशोधन संस्था – सीआयसीआर नागपूरच्या वनस्पती संरक्षण विभागाचे प्रमुख गणेश बेहरे, नागपूरच्या कृषी विभागाचे सहसंचालक यु. आर. घाटगे, लेखा आणि वेतन कार्यालय नागपूरचे प्रमुख लेखा अधिकारी मिलिंद रामटेके उपस्थित होते.
याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या संयुक्त संचालक स्मिता पांडे त्यांनी ‘नॅशनल पेस्ट सर्वेलन्स सिस्टीम-एनपीएसएस’ विषयी माहिती दिली. या ॲपच्या आधारे आपल्या शेतातील पिकांचा फोटो अपलोड करून या पिकावर कोणती कीटकनाशके वापरली पाहिजे याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळतं. या ॲपचा फायदा शेतक-यांना मिळण्याकरीता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपुढे या ॲपचे सादरीकरण तसेच प्रात्यक्षिक करण्याचे आवाहन त्यांनी केले .
नागपुरातील क्षेत्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्रांच्या अंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश गोवा, गुजरात या पाच राज्यातील राज्यशासनातील कृषी अधिका-यांना कीड व्यवस्थापनाबाबतचे दीर्घकालीन तसेच अल्पकालीन अवधीचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती डॉ.ए.के.बोहरिया यांनी दिली.
नागपूरच्या कृषी विभागाचे सहसंचालक यु आर घाटगे यांनी खताच्या तसेच कीटकनाशक आणि तणनाशकांच्या वापरासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे तंत्र समजावून घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जैविक खतांचा देखील वापर करणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले.
पिकांच्या नुकसानीसाठी कारणीभूत असलेल्या किडीच्या वेळीच प्रतिबंधासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील वापर केला जात असून किडीचे प्रमाण , त्यांची संख्या यांची तपशीलवार माहिती तंत्रज्ञानाद्वारे मिळते असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे वनस्पती संरक्षण विभागाचे प्रमुख गणेश बेहरे यांनी यावेळी सांगितले.
14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या पाच दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कृषी अधिकाऱ्यांना जैविक नियंत्रणाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचावे याचे प्रात्यक्षिक अभ्यास त्याचप्रमाणे व्याख्यानयांच्याद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूरद्वारे शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन करिता यांत्रिक पद्धतीमध्ये सापळ्यांची रचना,रासायनिक नियंत्रणासाठी निंबोळी अर्कासारख्या कीटनाशकाची निवडत्याचप्रमाणे जैविक नियंत्रणासाठी मित्र कीटकांच्या व्यवस्थापनात बाबत शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली जात असून शेतकऱ्यांना कीटकनाशकांची निवड कशी करावी याबाबत देखील मार्गदर्शन केले जाते.