नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डीमार्फत दिनांक 23 डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस दिनाचे’ आयोजन डॉ. सारीपुत लांडगे, वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर तालुक्यातील वाकोडी येथे करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने विशेष अतिथी म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ कमलेश चांदेवार, प्रक्षेत्र व्यवस्थापक भूषण भक्ते, मनोहर जुनघरे सरपंच वाकोडी, तसेच कृषी पर्यवेक्षक रोशन डंभारे हे उपस्थित होते.
कमलेश चांदेवार यांनी राष्ट्रीय शेतकरी दिवस पार्श्वभूमी मांडून नैसर्गिक शेती व तिचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच रासायनिक कीटकनाशक व खतांमुळे जमिनीवर व वातावरणामध्ये होणारे विपरीत परिणाम, मानवी शरीरामध्ये होणारे आजार यावर माहिती दिली. नैसर्गिक शेती मधील विविध घटक, जीवामृत, बिजामृत, दसपर्णी अर्क यांना बनविण्याची पद्धत समजून सांगितले. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी काही प्रमाणात का होईना, नैसर्गिक शेती अवलंबली पाहिजे असे सांगितले.
रोशन डंभारे यांनी कृषी विभागातील विविध उपाययोजना या विषयी माहिती दिली. शेतकऱ्यांनी शेती बरोबर जोडधंदा म्हणून पशूपालन, कुकुटपालन, शेळीपालन करण्याकरिता शासकीय उपाय योजनांचा माहिती दिली, तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण कश्या प्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.