नागपूर, दि. 28 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत 6 ते 16 एप्रिल 2022 या दहा दिवसाच्या कालावधीत पडताळणी विषयक शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याचा आढावा समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतला. या कालावधीत शिबीरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे यशस्वीरित्या नियोजन केल्याबाबत त्यांनी विशेष अभिनंदन केले.
डॉ. नारनवरे पुढे म्हणाले की, जाती पडताळणीचा रेकॉर्ड लावतांना तो जिल्हानिहाय व जातीनिहाय लावावा. तसेच वंशावळीचे सॉफ्टवेअर तयार करा, वंशावळीही ऑनलाईन करण्यात यावी. जेणेकरुन एकाच कुटुंबातील किती जणांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले हे अर्ज तपासतांना दिसून येईल. प्रलंबित अर्ज लवकर निकाली काढा. जातीनिहाय अर्जाचे वर्गीकरण करा. रेकॉर्ड व्यवस्थित लावा त्यामुळे जातीनिहाय किती अर्ज आहे हे कळेल, अशा सूचनाही यावेळेस डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी जात पडताळणी समिती नागपूरच्या कामाबाबत समाधानही व्यक्त केले.
यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष शैलेंद्र कुमार मेश्राम, समितीचे उपायुकत तथा सदस्य सुरेंद्र पवार, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, संशोधन अधिकारी आशा कवाडे, हे उपस्थित होते