समितीने निवड केलेल्या पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे आणि त्यात राज्यसरकारने हस्तक्षेप करणे गैर आणि निषेधार्ह आहे – अजित पवार

राज्यातील सध्याचे सरकार हे पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करत आहे…

आताचे राज्यसरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे…

प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का?…

मुंबई  – अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाड्मय पुरस्कार अनघा लेले यांना कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मागील सहा दिवसात पडद्यामागे काही बर्‍याच घडामोडी झालेल्या दिसत असून दिनांक १२ डिसेंबरला अचानक राज्यसरकारने आदेश काढत पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाड गांधी यांच्या पुस्तकासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला. साहित्य, संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांनी नेमलेल्या समितीने निवड केलेल्या पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे त्यात सरकारने हस्तक्षेप करणे गैर आणि निषेधार्ह आहे असे स्पष्ट करतानाच त्यात राजकीय लोकांनी अजिबात ढवळाढवळ करायची नसते अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानभवनात पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

६ डिसेंबर २०२२ रोजी राज्यसरकारने २०२१ मधील उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार जाहीर केले. २०२१ मध्ये आमच्या सरकारने हे ३३ पुरस्कार जाहीर केले होते असेही अजित पवार म्हणाले.

शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून नवीन वाद काढायचे आणि नवीन समस्या निर्माण करायच्या व बेरोजगारी व महागाई या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच काम राज्यसरकारचे सुरू असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला.

आता तर राज्य सरकारने कहरच केला आहे असे सांगतानाच राज्यसरकारचा साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप हा निषेधार्ह आहे. वास्तविक यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून साहित्य, संस्कृती व कला या सगळ्याला एक मानसन्मान मिळाला त्याचा एक आदर ठेवला गेला आणि तीच परंपरा असंख्य मान्यवरांनी पुढे चालवली आहे आणि त्याचप्रकारची घडी बसली असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

साहित्य क्षेत्राला पूर्णपणे मुभा द्यायची असते. कारण त्यांच्या क्षेत्रात जसे अलीकडच्या काळात वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात त्याच क्रीडाप्रकारांनी नावाजलेले खेळाडू ज्येष्ठ असणार्‍यांना घेतले जाते. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करत आलो आहोत. परंतु कधी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. महाराष्ट्र भूषणासंदर्भात समितीने शिफारस केलेली नावे त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे असतात. शासनकर्ते म्हणून आम्ही नेहमी आदर केला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आणीबाणीच्या काळात जाहीर झालेले पुरस्कार रद्द करण्याची घटना घडली होती. ती तर घोषित आणीबाणी होती त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी मोजली होती. परंतु राज्यातील सध्याचे सरकार हे पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत अजित पवार यांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला.

साहित्य क्षेत्रातील या सरकारचा हा पहिलाच हस्तक्षेप नाहीय. वर्धा येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांची निवड जवळपास फायनल झाली होती परंतु त्यांचे भाषण अडचणीचे ठरेल या भीतीने सरकारने संयोजकावर दबाव आणून त्यांची निवड रोखली असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी यावेळी केला.

अरे बोलू द्या ना…प्रत्येकाला आपली मतं मांडू दे ना… संविधानाने… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, ती आपली परंपरा आहे. वैचारिक मतभेद असू शकतात… विचारांची लढाई, विचारांनी लढा ना… कुणी अडवले आहे असा सवाल करतानाच त्यामध्ये आमच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही अध्यक्षपद घेऊ देणार नाही. ही लुडबुड तुम्हाला कुणी करायला सांगितली आहे. हे आताचे राज्यसरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्र निडर आहे हे अशा दबावाला जुमानणार नाही आणि त्यांनी अजिबात जुमानू नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

शरद बाविस्कर, आनंद करंदीकर यांनी जाहीर झालेले पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे हे सरकारला कळत नाही का? तुम्ही एक पुरस्कार रद्द करताय परंतु इतरांना दिलेले पुरस्कार ते नाकारत आहेत. त्यांच्या मनात काय खदखदत आहे. प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.

हे पुरस्कार समितीने जाहीर केले होते. त्यात राज्यसरकारचा हस्तक्षेप झालेला उघड – उघड दिसत आहे. यावर बोलत असताना लंगडं समर्थन करत आहेत. अरे तो अनुवाद केलेला आहे. त्याच्याआधी इंग्रजी पुस्तक वाचनात आले त्यावेळी बोलायचे होते परंतु तशापध्दतीने झाले नाही. साहित्य क्षेत्र असो किंवा कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्रात राजकारण आणू नये राज्यकर्त्यांनी त्यामध्ये ढवळाढवळ करू नये असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

जर राज्याच्या हिताचे असेल, राज्याच्या एकसंघतेला कुठे धक्का लावणारा असेल किंवा आणखी काही करणारा असेल, देशद्रोही काम झाले असेल तर गोष्ट वेगळी आहे. चित्रपट निघाला की अनेकजण सोशल मिडियावर वेगवेगळी मागणी करतात सुरुवातीला तीव्रता असते पण नंतर मात्र वाद झाला की लोक चित्रपट पहायला जातात. जी समिती होती ती महाराष्ट्रातील आहे त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केला असेल अभ्यास केला असेल ना? एका संबंधित मंत्र्यांचे लंगडं समर्थन आहे. त्यामुळे पुन्हा सांगतो हा अनुवाद आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जी – 20 परिषदेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न - मंत्री मंगल प्रभात लोढा

Thu Dec 15 , 2022
मुंबई : जी – 20 परिषदेसाठी जगभरातून आलेल्या विविध देशाच्या प्रतिनिधींना राज्यातील पर्यटनस्थळ, ऐतिहासिक वारसास्थळे, कृषी पर्यटन, वन्यजीव पर्यटनाची माहिती मिळावी, यासाठी सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे छोटेखानी प्रदर्शन (स्टॉल) उभारण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यटन स्थळांची माहिती जागतिक पातळीवर पोहचण्यास मदत होईल, असे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.  मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्याला लाभलेला समुद्रकिनारा, विविध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com