संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अतिक्रमणाची समस्या केवळ शहरातच नाही तर शहरालगतच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आहे. येथेही अतिक्रमण धारकांनी वाहतुकीच्या मार्गांवर अतिक्रमण पसरवले आहे. जी इतरांसाठी समस्या बनली आहे. शहरालगत असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठे गाव समजल्या जाणाऱ्या येरखेडा येथील भूषण नगर येथील रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने स्थानिक नागरिक नाराज झाले होते. लोकांना त्रास होत होते. या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारीही करण्यात आल्या, मात्र बराच काळ कार्यवाही होत नसल्याने ही समस्या जैसे थेच राहिली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसमधून निवडून आलेले सदस्य सतीश दहाट यांनी या समस्येची दखल घेत भूषण नगर प्रभाग क्र. ५ मध्ये रस्त्यावर पसरलेले अतिक्रमण स्वत: उभे राहून हटवले. अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान ग्राम सचिव जितेंद्र डावरे, , इम्रान नईम, नजीश परवीन, रोशनी भस्मे, कर्मचारी सुशील धांडे, जॉनी वंजारी आदींच्या उपस्थितीत अतिक्रमण काढून रस्ता अतिक्रमण मुक्त करून वाहतुकीसाठी मोकळा केला. यावेळी बोलताना सदस्य सतीश दहाट यांनी सांगितले की, लवकरच हा रस्ता नव्याने करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक मार्ग, नाले आदींवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत. त्या दिशेने ठोस कारवाईचे संकेत त्यांनी यावेळी दिले व ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावी अन्यथा ग्रामपंचायत प्रशासना तर्फे कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात येणार असून दंडात्मक कारवाईही सुद्धा करण्यात येणार आहे.