चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विपीन पालिवाल यांनी २०२३-२४ चा सुधारित व २०२४-२५ चा प्रस्तावित असा एकत्रित अर्थसंकल्प सादर केला असुन शिलकीच्या या अर्थसंकल्पात शहरातील विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. महसुली अनुदान आणि करापासून मिळणारे उत्पन्न यातून हा खर्च करण्यात येणार आहे.
२०२३-२४ चे सुधारित अंदाजपत्रक ४३७ कोटी ३७ लाख ३ हजार रुपयांचे असून, २०२४-२५ चे अंदाजपत्रक ५०९ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांचे आहे. २०२३-२४ च्या सुधारित अर्थसंकल्पात महापालिकेच्या विविध उत्पन्नाच्या स्त्रोतापासून ६० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. यातील २० कोटी २ लाख रुपये नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्राप्त झाले आहे. पुढील चार महिन्यांत ४० कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वसुलीची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान २.० अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःस्सारण प्रकल्प टप्पा १, रामाळा तलावाचे पुनरुज्जीवन सांडपाणी प्रक्रिया केंद्र व रिटेनिंग वॉलचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत. या तिन्ही प्रकल्पांची एकूण किंमत ८५७ कोटी ७२ लाख आहे. यात २८५.८८३ कोटी केंद्र शासन, ३१४.५२६ कोटी राज्य शासन निधी देणार आहे. तर मनपाला २५७.३११ कोटी रुपये आपला हिस्सा टाकावा लागणार आहे. प्रकल्प कार्यादेश दिल्यानंतर २ वर्षांत पूर्ण करावयाचे आहे. खनिज विकास निधी, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मनपा आपला ३० टक्के हिस्स्याचा निधी उभा करणार आहे.
दिव्यांग धोरणाअंतर्गत १ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत २० कोटी २७ लाख रुपये खर्च झाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान, सुवर्ण जयंती नगरोत्थान, शिक्षण विभाग वेतन यात मनपाचा ३० टक्के हिस्सा द्यायचा आहे. २०२४-२५ मध्ये विविध योजनेकरिता ३० कोटी मनपाचा हिस्सा प्रस्तावित केला आहे. खासगी कंत्राटदाराद्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक याकरिता १५ कोटी, नाली सफाईकरिता १२ कोटी, मनपाची सर्वसाधारण निवडणूक खर्चासाठी ५ कोटीची तरतूद केली आहे. शहरातील ९० हजार ९६० मालमत्ताधारकांकडून २०२४-२५ मध्ये ३६ कोटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न निर्धारित केले आहे. ८५ टक्के वसुली पूर्ण झाल्यास ३० कोटी ५८ लाख रुपये प्राप्त होणार आहेत.
मीटरद्वारे जलमोजणी करून वापर आधारित पाणी शूल्क घेतल्यास यातून ४८ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. शहरात ५५ हजार नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. अमृत २.० अंतर्गत ४० हजार नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. शहराला दररोज पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासोबतच दोन वॉर्डात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची योजना प्रायोगिक तत्वावर राबविली जाणार आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अमृत २.० पाणीपुरवठा योजनेतून १५ कोटी, तर अमृत २.० मलनिस्सारण योजनेतून १७६.८५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
सिटी बस प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. शहरासाठी ५० बसेस उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे. ई-बस चार्जिंग इंन्फ्रास्ट्रक्चर बस डेपो, बस चालविण्याकरिता प्रती किमी २९ रुपये अनुदान केंद्राकडून मिळणार आहे. इमारती, पथदिवे, पाणीपुरवठा यावर १० कोटी ७५ लाख रुपये विज बिलावर खर्च होतात. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे या खर्चात बचत करण्यात येणार आहे. जलप्रदूषण थांबवण्यासाठी रहमतनगर पठाणपुरा येथील एसटीपी येथे सुद्ध करून दररोज ५० एमएलडी पाणी वीजकेंद्राला पाठविले जाईल. तसेच रामाळा तलाव येथे येणारे जलनगर, मच्छी नाला येथील पाणी अडवून शुद्ध केले जाणार आहे. यासाठी अमृत २.० आणि खनिज विकास निधीतून रकम उभारली जाणार आहे. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी १०० किलोमीटर रस्त्यांच्या किनाऱ्यावर पेव्हमेंट लावण्यात आले असून, ३ ठिकाणी मोठे वाटर फाऊंटेन लावले आहेत.
उत्पन्नाचे स्त्रोत –
मालमत्ता कराचे फेर मूल्यांकन २०२४-२५ मध्ये झाल्यास मालमत्ता व इतर करातून ५३ कोटी ७८ लाख रुपये प्राप्त होतील. सफाई शूल्काच्या माध्यमातून ७ कोटी, उपयोगिता शूल्कातून ८ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम परवानगी व विकास शूल्कापोटी ५ कोटी रुपये, गुंठेवारी ६० लाख रुपये, जीएसटी अनुदान ९३ कोटी ६ लाख, १५ वा वित्त आयोग २०२३-२४ मध्ये २० कोटी, २०२४-२५ मधील १५ कोटी, माझी वसुंधरा अभियान २ कोटी, मनपा इमारती आणि गाडे भाडे यातून ९३ लाख, पाणीपुरवठा करातून १० कोटी, पाणीपुरवठा मिटरिंग व टेलिस्कोपिंग शूल्कातून ३.५० कोटी, प्रधानमंत्री आवास योजना, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, नगरोत्थान अभियान, मूलभूत, पायाभूत सोयी सुविधा, वैशिष्टपूर्ण योजना, रस्ता अनुदान, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम, घरकचरा व्यवस्थापन केंद्र, राज्य शासनाच्या योजना राबविण्याकरित २०२४-२५ मध्ये १३०.५७ कोटी रुपयांचे अनुदान मिळणे अपेक्षित आहे.
यावर होणार खर्च –
आस्थापना खर्च ४१ कोटी ४२ लाख, अग्निशमन, यांत्रिकी, स्वच्छता, पाणीपुरवठा, बगीचा व इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन १८ कोटी ३० लाख, विविध योजनेतील मनपाचा हिस्सा ३० कोटी, महिला व छोटी मुले विश्रामगृह, बालोद्यान, महिलांकरिता इतर सुविधा व योजना राबविणे ७५ लाख, तृतीयपंथींच्या विकासासाठी विविध प्रशिक्षण, सुविधा, समाजकल्याण कुटुंब सर्वेक्षण यावर १ कोटी ६६ लाख, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांकरिता सुविध पुरविणे ३० लाख, नागरी दलित वस्ती योजना १५ कोटी, दिव्यांग कल्याणकारी योजना, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम ५ टक्के निधी राखीवनुसार १.३० कोटी, शहर, चौक सौंदर्यीकरण ७५ लाख, खुल्या जागांचा विकास ३ कोटी, रस्ता बांधकाम २ कोटी, झोनअंतर्गत विविध कामे ९० लाख, आकस्मिक खर्च २.६१ कोटी, घनकचरा वाहतूक १५ कोटी, नाली सफाई १२ कोटी, विकास योजना आराखडा २ कोटी, निवडणूक खर्च ५ कोटी रुपये तरतूद केली आहे