मुंबई :- कामगार ही एक मोठी ताकद असून त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने जी 20 परिषदेच्या अंतर्गत असलेले एल 20 हे उपयुक्त माध्यम असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.
परेल येथील नारायण मेघाजी लोखंडे विज्ञान संस्थेत आयोजित लेबर – 20 च्या प्रास्ताविक बैठकीत मंत्री सुरेश खाडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार आयुक्त संतोष देशमुख, मजदूर संघाचे माजी अध्यक्ष सी. के. साजीनारायण, अनिल डुमणे, येलोरे, बापू दरड, इतर संबंधित उपस्थित होते.
मंत्री सुरेश खाडे म्हणाले की, यावर्षी जी-20 चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. जी 20 च्या निमित्ताने 20 विविध क्षेत्रातील गटांची निर्मिती केलेली असून त्यात उद्योग, विज्ञान, स्टार्ट-अप, शेती, वैचारिक, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, युवा असे वेगवेगळे गट आहेत. यातील लेबर-20 हा एक गट आहे. हा जी-20 च्या सदस्य देशांतील कामगार या विषयाचा गट आहे. या गटात सदस्य देशातील कामगार संघटनेचे प्रतिनिधी एकत्र येवून विविध कामगार विषयावर चर्चा करतात, त्यावर एकमत करून ते विषय सदस्य देशांनी आपल्या देशामध्ये राबवावे असे अपेक्षित आहे.
एल 20 ने सामाजिक सुरक्षा आणि महिलांचे भविष्यातील कामाचे स्वरूप, सहभाग, कामाच्या ठिकाणी वातावरण, गुणवत्ता वाढ हे विषय निवडलेले आहे. जे कामगारांना अधिक सुविधायुक्त आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवणारे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठीच्या महत्वपूर्ण सुधारणा सुचवले, असे मंत्री सुरेश खाडे म्हणाले.
महिला या कौशल्यपूर्ण, वेळेत काम करण्याची क्षमता असलेल्या समाजातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या अधिकारांसाठी देखील एल 20 निश्चितच उपयुक्त ठरेल. कामगारांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असून माथाडी कामगारांना मूलभूत सोयीसुविधा कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ करण्याचाही निर्णय विभागाने घेतला असल्याचे मंत्री खाडे यांनी सांगितले.
कामगार आयुक्त संतोष देशमुख म्हणाले की, कामगार विषयाशी संबंधित एल 20 याची व्याप्ती मोठी आहे. शासन, प्रशासन आणि कामगार संघटना यांच्या सर्वांच्या एकत्रित सहकार्याने ही संकल्पना यशस्वी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सी. के. साजीनारायण म्हणाले की, जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान असलेल्या जी 20 चे यजमान पद भारताला मिळाले ही अभिमानास्पद बाब आहे. त्याअंतर्गत एल 20 च्या माध्यमातून कामगार क्षेत्रात भरीव स्वरूपात सकारात्मक बदल घडवून अधिक चांगल्या पद्धतीने कामगारांसाठी कल्याणकारी कामे करण्याची संधी मिळाली आहे.
कार्यक्रमास विविध उद्योग, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, संबंधित उपस्थित होते.