नागपूर :- भारतीय संविधानातून दलित, पिडीत, शोषित व वंचित समाजांना काँग्रेसने सामाजिक व राजकीय आरक्षण देवून मुख्य प्रवाहात आणण्याचे सतत कार्य राहीले आहे तर संविधान बदलून आरक्षण बंद करणार असे भाजपाच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर केले, हे जनतेला माहीत आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी कधीही आरक्षण बंद करण्यासंबंधी बोललेले नाहीत. भाजपा स्वत:च आरक्षणविरोधात खोटी बातमी पसरवून जनतेची दिशाभूल करीत आहे. भाजपाचे नेते सत्यता तपासून घेत नाहीत. जनतेमध्ये खोट्या बातम्या पेरून भ्रमीत करण्याची सवय भाजप नेत्यांना लागली आहे, भाजपाच्या या फेक नॅरेटिव्हला जनता बळी पडणार नाही. भाजपाच संविधान आणि आरक्षणविरोधी आहे हे सत्य जनतेला माहिती आहे.
काँग्रेसनेच संविधानातून मागासवर्गीयांना आरक्षण दिले, करोडो मागासवर्गीयांना नोकरी, शिक्षण, निवडणूक इत्यादीमध्ये आरक्षणातून संरक्षण मिळाले. भाजपाचे आरक्षणास नेहमीच विरोध राहीला आहे. लोकसभा व विधानसभेत महिलांना आरक्षण देण्यास काँग्रेसची सत्ता असतांना भाजपानेच विरोध केला होता, लोकसभा व विधानसभेत महिला आरक्षणाच्या अंतर्गत एसटी, एससी व ओबीसींच्या मागासवर्गीय महिलांचा आरक्षणास भाजपचा आजही विरोध आहे.जाती जनगणना करण्यास भाजपनेच विरोध केला. भारतात जाती जनगणना करून ५०%पेक्षा जास्त आरक्षण मागासवर्गीयांना देण्यास व लोकसंख्याप्रमाणे ओबीसीनां नोकरी, शिक्षण व योजनेत सामाजिक न्याय देण्यास काँग्रेसची स्पष्ट भुमिका आहे परंतु भाजपचा यास विरोध आहे.
भारतातील सर्व स्थानिक संस्थाच्या निवडणूकीत महिलांना आरक्षण देण्यासाठी संविधानात दुरूस्ती केल्यानंतर महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी निवडणूक, शिक्षण व नोकरीत आरक्षण काँग्रेसनेच दिले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे आरक्षण बंद करतील अशी तथ्यहीन व खोटी बातमी भाजपकडून पसरविण्यात येत असले तरी यांच्या छुपा एजेंडापासून जनता सावध झाली आहे.
काँग्रेस हा नेहमीच महिला समर्थक पक्ष राहिला आहे. भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसने महिलांवर कथित निर्बंध लादल्या आहेत. भाजप, आरएसएस आणि काँग्रेस यांच्यातील ही वैचारिक लढाई आहे. महिलांना एका विशिष्ट भूमिकेपुरते मर्यादित ठेवावे, त्यांनी अन्न शिजवावे, जास्त बोलू नये असे भाजप आणि आरएसएसचे मत आहे. आणि कॅाग्रेसचा असा विश्वास आहे की महिलांना जे काही करायचे आहे ते करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिकेत आरक्षण बंद करणार असे म्हणाले, असा दावा करून या पोस्ट व्हायरल करून त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.भाजप नेत्यांकडून करण्यात येत असलेला दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. आपल्या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना भारतात सर्वांसाठी समानता निर्माण होईल तेव्हाच आम्ही आरक्षणचा विचार करू परंतू सध्या भारताची अशी परिस्थिती समानतेची नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. मात्र काही लोक अर्धेच व्हिडीओ व्हायरल करून व खोटे बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.