– गिरीश पांडव दक्षिण नागपूरच्या सर्वागीण विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व – विकास ठाकरे
नागपूर :- काँग्रेसचे नेते, दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार गिरीश पांडव यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांनी 3 हजार ज्येष्ठांच्या आशीर्वादाने साजरा केला. रेशीम बागेतील महात्मा फुले सभागृहात आयोजित केलेल्या जेष्ठ नागरिक सत्कार सोहळ्याला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे यांनी उपस्थित राहून ज्येष्ठांशी संवाद साधला. गेल्या अनेक वर्षापासून कुठलीही अपेक्षा न ठेवता काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहे. जनतेच्या सुख – दुःखात अर्ध्या रात्री धावणारा आणि मदत करणारे नेते म्हणून त्यांचा दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात लौकिक आहे. युवक, महिला, जेष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर नेहमीच वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. आजवर त्यांनी कोणाकडूनच काही मागितले नाही पण त्यांचे कार्य बघता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तुमच्या, कुटुंबाच्या आणि मित्र परिवाराच्या आशीर्वादाची गरज आहे. आपण सर्वांनी त्यांना साथ दिल्यास याहीपेक्षा अधिक ताकदीने ते तुम्हा सर्वांची सेवा करतील असा शब्द तुम्हाला देतो असे विकास ठाकरे यावेळी म्हणाले.
गिरीश पांडव संवाद साधताना म्हणाले की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नाला, समस्येला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रशासन आणि सरकार दरबारी मांडून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोरोना, नैसर्गिक आपत्ती या काळात स्वतःहून नागरीकांच्या मदतीला धावलो, वेळोवेळी आरोग्य शिबिरे घेऊन सुदृढ आणि निरोगी समाज निर्मितीसाठी पुढाकार घेतला. बेरोजगार तरुणांच्या मेहनतीला आणि कष्टाला न्याय देण्यासाठी रोजगार महोत्सव आयोजित केले. धार्मिक उपक्रमातून नागरीकांच्या आनंदात सहभागी झालो. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा समाजाला फायदा झाला पाहिजे म्हणून त्यांचा यथोचित गौरव आपण या ठिकाणी केला. माता – भगिनिंच्या, युवकांच्या आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा या क्षेत्रातील प्रश्नांवर काम केले. हे करत असताना सर्वांचे मला मनभरून प्रेम मिळाले, साथ आणि सहकार्य मिळाले. सामाजिक क्षेत्रात काम करताना त्याला राजकीय ताकद मिळाली तर जनतेचे प्रश्न तातडीने सोडवता येतात हे खरे आहे. तुमच्या सर्वांच्या आग्रहाचा मी नम्रपणे स्वीकार करतो. कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आजवर मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी काम केले आहे, पक्ष देखील नक्कीच याची नोंद घेत असतो. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेले प्रेम आणि आशीर्वाद मला ताकद देणारे, आत्मविश्वास वाढविणारे आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.
या कार्यक्रमाला दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.