मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत होणार 39 पुस्तकांचे प्रकाशन

मुंबई :- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी 27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. यानुसार अत्यंत मौलिक अशा नव्या 39 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी, 2024 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने पुस्तक प्रकाशन या मुख्य उद्दिष्टानुसार आजमितीपर्यन्त 666 ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मागील वर्षभरात छपाई झालेल्या 39 पुस्तकांमध्ये प्रामुख्याने डॉ.अरुणा ढेरे लिखित ‘भारतीय विरागिणी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे.

या ग्रंथामध्ये भारतीय पातळीवरील काव्यविश्वातील कवयित्रींची- संत आणि भक्त अशा स्त्रियांची कालसंबद्ध पार्श्वभूमी, त्यांनी निवडलेले भक्तिमार्ग, त्यांचा परमार्थविचार, लौकिकाविषयीची त्यांची दृष्टी, त्यांनी केलेले कौटुंबिक आणि सामाजिक संघर्ष, त्यांची जीवनसाधना आणि त्यांनी व्यक्त केलेले स्त्रीत्वाचे संवेदन यांचे दर्शन होते. तर, ‘चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपरा माय धुरपता’ हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ संजीव भागवत यांनी लिहिला असून हा ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे. मातृदेवता आणि त्यांचे अस्तित्व सर्वसामान्यांमध्ये अजूनही कसे अबाधित आहे याचा दाखला हा ग्रंथ देतो. लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक यांच्यासाठी हा ग्रंथ दिशादर्शक असा आहे.

मंडळामार्फत प्रकाशित होत असलेल्या अन्य महत्त्वपूर्ण पुस्तकांमध्ये महाराष्ट्राच्या भौतिक प्रगतीबरोबरच भाषा, साहित्य, कलाकल्पना, वस्त्रप्रारणे, खाद्याभिरुची, नितीसंकल्पनांचा आशय केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा विस्तृत विवरणात्मक असा सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास मांडणारा ‘महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ (खंड-2) 1901-1950 (भाग-1 व भाग-2) हा रमेश वरखेडे यांनी लिहिलेला ग्रंथ, कै.प्राचार्य रामदास डांगे व कार्यकारी संपादक सुप्रिया महाजन यांनी संपादित केलेल्या ‘मराठी व्युत्पत्तिकोश’ हे पुस्तक, मंगला वरखेडे यांनी संपादित केलेल्या ‘अक्षरबालवाङ्मय’ या प्रकल्पातील तिसरा खंड ‘भ्रमणगाथा’ हा खंड, बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय चार खंडात प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने पूर्ण केला असून डॉ.विश्वास पाटील यांनी संपादन केलेल्या या प्रकल्पातील खंड-3 आणि खंड-4 चा समावेश आहे.

‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमालेअंतर्गत यापूर्वी प्रकाशित झालेले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पुनर्मुद्रित चरित्र, गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र, यापूर्वी प्रकाशित झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुनर्मुद्रित चरित्र, ‘कस्तुरबा गांधी जीवन चरित्र’, जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांचे चरित्र, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे चरित्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, डॉ.पतंगराव कदम यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देणारे चरित्र, ‘गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास’ या त्रिखंडात्मक प्रकल्पांतर्गत भाग-2 ‘अष्टांगांचा अभ्यास’ व भाग-3 ‘गोदा संस्कृती’ हे दोन महत्त्वपूर्ण खंड, याचबरोबरच मंडळाच्यावतीने यापूर्वी प्रकाशित झालेली ‘माणसाचा मेंदू व त्याचे कार्य’, खगोलशास्त्राचे विश्व, स्वातंत्र्याविषयी, अभिनय साधना, बोस्तान, यशोधन, मराठी शब्दकोश, पोर्तुगीज-मराठा संबंध, तमिळ भाषा प्रवेश, गजाआडच्या कविता व उर्दू-मराठी शब्दकोश इत्यादी अशी मुद्रित व पुनर्मुद्रित मिळून 39 मौलिक पुस्तके वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मंडळाच्या या पुस्तकाच्या माध्यमातून एकूणच मौलिक ग्रंथऐवज वाचकांना उपलब्ध होत असल्याची भावना डॉ.मोरे यांनी व्यक्त केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा - विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Tue Feb 27 , 2024
मुंबई :- राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह राज्यभरात होणाऱ्या औद्योगिक दुर्घटना विषयी उपाय योजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस देविदास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com