– ‘सायकल फॉर नागपूर’ लोगोचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण
नागपूर :- ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने ३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीच्या अनुषंगाने गुरूवारी (ता. १८) मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सायकल रॅलीचे ‘सायकल फॉर नागपूर’ लोगोचे अनावरण केले.
यावेळी उपायुक्त सुरेश बागडे, शहराचे बायसिकल मेअर डॉ. अमित समर्थ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, मनपा शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक शिक्षणाधिकारी सुशील बन्सोड, डॉ. पद्माकर चारमोडे, अशफाक शेख, नागपूर एनसीसी ग्रुपचे कैलाश पटले, एनडीएए चे गणेश वाणी, प्रदीप देशपांडे, जयंत मेंढी, अंकीत शेगावकर, दिलीप वाकड आदी उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्तांनी सायकल रॅलीच्या आयोजनासंदर्भात चर्चा करून सूचना मांडल्या. शनिवार ३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिका मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथून १६ किमीच्या रॅलीला शुभारंभ होईल. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करणे अनिवार्य आहे. मनपाच्या अधिकृत www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील ‘World Bicycle Day Rally Registration Form’ यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून नि:शुल्क नोंदणी करता येईल. इच्छूकांनी ३१ मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी झालेल्या सहभागींना मनपातर्फे टी-शर्ट दिली जाणार आहे.
सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मनपाद्वारे सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना पत्र देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले. सायकल रॅलीमध्ये नागपूर शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, सायकलप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येत सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे.
सायकल रॅलीचा मार्ग
सुरूवात – मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स – लिबर्टी टॉकीज चौकातून डावीकडे – छावणी चौक – जुना काटोल नाका चौक – जापनीस उद्यान चौक – लेडिज क्लब चौक – लॉ कॉलेज चौक -शंकर नगर चौकातून डावीकडे – झाशी राणी चौक – लोहापूल नवीन अंडरपास उजवीकडे – मोक्षधाम चौक – अशोक चौक – रेशीमबाग चौक – जगनाडे चौकातून डावीकडे – गंगाबाई घाट चौकातून डावीकडे – टेलिफोन एक्सचेंज चौक – सी.ए. रोड – मेयो हॉस्पीटल – संविधान चौक – मनपा मुख्यालय – समापन.