– निळ्या पाखरांनी फुलला संविधान चौक, भदंत ससाई यांचे मार्गदर्शनात निघाली डॉ. आंबेडकर धम्मज्योत मिरवणूक, पोलिसांचा चोख बंदोबस्त
नागपूर :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवार, 13 एप्रिलला रात्री 9 वाजता इंदोरा बुद्धविहारातून डॉ.आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी बुद्धवंदनेनंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यंदा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी संविधान चौकात उपस्थित राहून सुरक्षेचा आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत ते सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.
इंदोरा बुद्धविहार, अखिल भारतीय धम्मसेना आणि आंबेडकरी अनुयायींच्या संयुक्त वतीने निघालेल्या डॉ. आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीत उपासक, उपासिका आणि अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब यांचे छायाचित्र असलेले तसेच इतर देखाव्यांचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. पंचशील ध्वज, निळी टोपी लक्ष वेधून घेत होती.
‘बुद्धम शरणम् गच्छामी। धम्मम शरणम् गच्छामी। संघम शरणम् गच्छामी।’ बुद्धवंदना म्हणत मिरवणूक इंदोरा चौक, कामठी मार्ग, गड्डीगोदाम, लिबर्टी टॉकीज मार्गाने संविधान चौकात पोहोचली. भदंत ससाई यांच्या हस्ते संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुद्धवंदनेनंतर ससाईंनी अनुयायांना मार्गदर्शन केले.
यासोबतच शहरातील प्रत्येक बुद्धविहारातून निघालेली मिरवणूक रात्री 12 वाजेपर्यंत संविधान चौकात एकत्रित झाल्या. या रॅलींमध्ये हजारोंचा जनसमुदाय होता. अनुयायांच्या गर्दीने रस्ते फुलले होते. लख्ख अशा रोषणाईने मध्यरात्री दिवस असल्याचा भास होत होता. संविधान चौक निळ्या पाखरांनी फुलला होता. निळ्या गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भीम जल्लोष पहाटेपर्यंत सुरू होता. बाबासाहेबांची जीवनगाथा सांगणार्या गीतांमुळे अनुयायांमध्ये जोश संचारला होता.
या मिरवणुकीत भंते धम्मप्रकाश, महानागा, भंते प्रज्ञा बोधी, धम्म बोधी, भीमा बोधी, भते नागानंद, भंते संघघोष, भंते नागसेन, विनयशील, धम्मशील, अश्वजित, धम्म विजय,मिलिंद, भिक्खूनी संघप्रिया, नागकन्या, धम्मसुधा, किसा गौतमी, पुन्नीका, धम्मशीला, धम्मप्रिया, संघमित्रा, बोधी आर्या, आम्रपाली, इंदोरा बुद्धविहार कमिटीचे सचिव अमित गडपायले, अॅड. भास्कर धमगाये, अॅड. अजय निकोसे, विजय इंदूरकर, आनंद राऊत, विक्रांत गजभिये, नितीन गणवीर, सुनील अंडरसहारे, रोशन उके यांनी सहकार्य केले.