नागपूर :- १८ जूनला डॉ. आशिष र. देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली. त्यानंतर मिडिया प्रतिनिधींनी त्यांच्याशी वार्तालाप केला.
डॉ. आशिष र. देशमुख म्हणाले, “भाजपमध्ये माझा पुनर्प्रवेश आहे. कालच मी शिर्डीवरून आलो असून संयम, श्रद्धा आणि सबुरीचे मी साईबाबांकडून आशीर्वाद घेतले आहेत. माझी पुढची राजकीय वाटचाल ही संयम, श्रद्धा आणि सबुरी यावर विश्वास ठेऊन राहील, याबद्दल काही दुमत नाही. त्यासाठी नितीन गडकरी यांचेकडूनसुद्धा आशीर्वाद मिळाले आहे.
मी आमदारकीची किंवा कोणत्याची प्रकारची मागणी भाजपकडे केलेली नाही. या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल आणि कार्यकर्ता म्हणून देखील काम करण्याची जर गरज पडली तर ओबीसींसाठी आणि विदर्भाच्या हितासाठी मी नक्की कार्यरत राहील. माझी राजकीय वाटचाल ही कोणत्याही एका मतदार संघापुरती मर्यादित नसून विदर्भाच्या हितासाठी आणि ओबीसींच्या कल्याणासाठी राहणार आहे. जनतेच्या भेटीला मी लवकरच निघणार आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे की, भाजपमध्ये प्रवेशाचा संपूर्ण कार्यक्रम हा जिल्हा भाजप आणि नागपूर शहर भाजपतर्फे आयोजित करण्यात येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या गावात, कोराडीमध्ये, हा कार्यक्रम आयोजित केला होता.
२००९ मध्ये जेव्हा नितीन गडकरी हे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत कस्तुरचंद पार्कवर नरेंद्र मोदी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी मला पश्चिम नागपूर मधून उमेदवारी देऊ केली होती. पण जेव्हा ऑक्टोबर २००९ मध्ये प्रत्यक्षात विधानसभा निवडणुका लागल्या तेव्हा ऐनवेळी काही घडामोडी झाल्या आणि मला भाजपने, विशेष करून नितीन गडकरी यांनी सावनेर येथून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी दिली. फारच कमी मतांनी मी ती निवडणूक हरलो. २०१४ मध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती तुटली तेव्हा शेवटच्या दिवशी मला काटोल येथून लढण्यासाठी उमेदवारी नितीन गडकरी यांनी दिली. तिथे अनिल देशमुख यांचा मी पराभव केला. म्हणून सातत्याने माझ्या राजकीय वाटचालीमध्ये अतिशय महत्वाची अशी भूमिका नितीन गडकरी हे निभावत आले आहेत. माझ्यासाठी ते पितृतुल्य आहेत. त्यांचा आशीर्वाद हा सदैव माझ्या पाठीशी आहे. त्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या संपूर्ण राजकीय वाटचालीमध्ये मी नक्कीच यशस्वी होईल, अशी मला खात्री आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांबद्दल कॉंग्रेसमध्ये सर्वत्र नाराजी आहे. विदर्भात आणि संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसजनांचा आक्रोश सर्वांना बघायला मिळतो. या संदर्भातला ‘अंतिम निकाल’ दिल्ली येथील पक्षश्रेष्ठी देतील. मी कॉंग्रेसमध्ये नसल्यामुळे अधिक बोलणे योग्य होणार नाही.”