तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरी सुविधा पुरण्याबाबत तत्पर व्हा : मनपा आयुक्त तथा प्रशासक, नागपूर महानगरपालिकेचा स्थापना दिन उत्साहात साजरा

नागपूर : समाजातील प्रत्येक स्तरातील व्‍यक्तीपर्यंत दररोज पोहोचणारी यंत्रणा नागपूर महानगरपालिका आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे जनतेला विविध ४२ प्रकारच्या नागरी सुविधा पुरविल्या जातात. शहराची लोकसंख्या वाढत असताना या सर्व सुविधा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत मनपाची जबाबदारी वाढत आहे. मनपाचा प्रत्येक विभाग हा शहरातील प्रत्येक नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याने आपापल्या विभागाचे मुळ उद्दिष्ट लक्षात घेउन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुविधा पोहोचविण्यास तत्पर असावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागपूर महानगरपालिकेच्या ७२व्या स्थापनादिनी कर्मचा-यांना केले.गुरूवारी (ता.२) मनपा मुख्यालयात नागपूर महानगरपालिकेचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मुख्यालयातील हिरवळीवर मनपाचे प्रथम महापौर बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा, उपायुक्त मिलींद मेश्राम, उपायुक्त प्रकाश वराडे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर आदी उपस्थित होते.या प्रसंगी मनपा आयुक्तांनी नागपूर महानगरपालिकेच्या ७२व्या स्थापना दिनानिमित्त आतापर्यंतच्या मनपाच्या भरारीची साक्ष देणारे ‘बलून’ आकाशात सोडले. मनपाच्या स्थापना दिनाच्या अनुषंगाने मनपा शाळेतील शिक्षक दाम्पत्य प्रगती व सुनील सरोदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर आकर्षक जी-२० शिखर परिषदेच्या आयोजनाचा संदेश देणारी रांगोळी साकारली होती. आकर्षक कलाकृतीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सरोदे दाम्पत्याला तुळशी रोप देउन सन्मानित केले. नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या शाळांमधील मुलांनी उत्तम पथनाट्य सादर करून उपस्थित अधिकारी, कर्मचा-यांकडून कौतुकाची दाद मिळविली. मुलांनी जी-२० शिखर परिषदेच्या अनुषंगाने शहरात होणा-या नागरी सुविधांच्या बैठकीची माहिती अतिशय मनोरंजकपणे सादर केली. याशिवाय स्वच्छता, ओला, सुका कचरा विलगीकरण, झिरो वेस्ट याबाबतही पथनाट्याद्वारे जनजागृती केली. पथनाट्याची कथा निकीता ढाकुलकर यांनी लिहिली तर मंगल सानप यांनी पथनाट्याचे संपूर्ण समन्वयन केले. याचे संयोजक रुपेश सानप होते.मनपाच्या संगीत शिक्षकांच्या संचाने बहारदार गीत सादर केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गायले गेले. यानंतर संगीत चमूने स्वागत गीत व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘जय जय शिवराया’ हे गीत सादर केले. मनपाच्या लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेचे संगीत शिक्षक प्रकाश कलसीया यांच्या नेतृत्वातील संगीत चमूमध्ये शिक्षिका फुलांबरकर, शुभांगी पोहरे, कहकशा जवीन, आशा मडावी यांचा समावेश होता. त्यांना तबल्यावर आदित्य धरमारे आणि मायनरवर हर्षल वैरागडे यांनी साथ दिली.कार्यक्रमाचे संचालन करताना जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी महानगरपालिकेचा आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. नगरीचे प्रथम महापौर बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांची कारकीर्द ते पुढे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा प्रवासही त्यांनी अधोरेखीत केला. मनपाला लाभलेल्या आयुक्तांच्या यशस्वी वाटचालीही माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणा-या सर्वांचे त्यांनी शेवटी आभारही मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शरद पवार यांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या राम सातपुतेच्या विरोधात राष्ट्रवादी आमदार आक्रमक...

Fri Mar 3 , 2023
अखेर भाजप आमदार राम सातपुतेंनी मागितली माफी… मुंबई – शरद पवार यांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या भाजप आमदार राम सातपुते यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना जाहीर माफी मागावी लागली. विशेष म्हणजे भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com