– जिल्हाधिकाऱ्यांकडून आचारसंहितेबाबत आढावा
यवतमाळ :- निवडणूक आयोगाने निवणूकीची घोषणा केल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात कोठेही या आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आचारसंहिता लागल्यानंतर सर्व प्रकारचे राजकीय बॅनर, पोष्टर, होर्डिंग, कटआऊट, जाहिराती काढून टाकण्याचे निर्देश आहे. त्याप्रमाणे शासकीय व खाजगी ईमारतींवरील राजकीय जाहिराती, फोटो काढणे आवश्यक असून त्यासाठी आयोगाने कालावधी निश्चित करून दिला आहे. या कालावधीत आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई व पुढे करावयाच्या कारवाईची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. कालमर्यादेत या बाबींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
कोणत्याही प्रकारचे पोष्टर, बॅनर, कटआऊट यापुढे पुर्व परवानगीशिवाय लावल्या जावू नये, असे निदर्शनास आल्यास आयोगाच्या निर्देशाप्रमाणे योग्य कारवाई केली जावी. शासकीय ईमारतींवर प्रचार करणे प्रतिबंधात्मक आहे. खाजगी ईमारतीवर देखील राजकीय स्वरूपाचे काही लावावयाचे असल्यास स्थानिक संस्था व ईमारत मालकाची परवानगी आवश्यक आहे. जी शासकीय कामे सुरु आहे, तेवढीच सुरु ठेवता येतील. जी कामे सुरुच झाली नाही, अशी कामे करता येणार नाही.
अतितातडीने करावयाची कामे, टंचाईची कामे पुर्व परवानगीने केली जावी. यापुढे कोणतेही काम करतांना विभागांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खात्री व पुर्व परवनागीनेच करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत बैठक
निवडणूक काळात विविध बाबींवर होणाऱ्या खर्चाचे दरपत्रक प्रशासनाकडून तयार करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली. जिल्ह्यात निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासह आदर्श आचारसंहितेचा कोठेही भंग होणार नाही यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.